पान:आमची संस्कृती.pdf/90

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / ८३

संज्ञा योजाव्यात म्हणजे घोटाळा होणार नाही, ही त्यांची सूचना प्रत्येक मानवशास्त्र व समाजशास्त्र अभ्यासणाच्याने मूलतत्त्व म्हणून ग्रहण करण्यासारखी आहे. धर्म किंवा संस्कृती ही प्रथम ज्या लोकांत उगम पावते तेथेच न राहता हळूहळू इतर भूप्रदेशांवर व लोकसमूहांत परसते, आणि म्हणून धर्मसंप्रदायनिदर्शक किंवा संस्कृतिनिदर्शक नावे, जेव्हा वंशाबद्दल किंवा रक्ताबद्दल बोलावयाचे असेल तेव्हा योजू नयेत, हे तत्त्व आता मानवशास्त्रांत सर्वमान्य झाले आहे. हे तत्त्व न कळल्यामुळे प्रथम पाश्चात्य पंडितांनी जेव्हा संस्कृत वाङमयाचा अभ्यास करून संस्कृत भाषा इतर काही युरोपीय भाषांसारखी आहे हे पाहिले तेव्हा लगेच हिंदूंचा व युरोपियांचा रक्तसंबंधही जोडून टाकिला. ब्राह्मण हा शब्द वर्गनिदर्शक व कर्मनिदर्शक आहे, तो काही रक्तशुद्धीचा पुरावा नव्हे, ही गोष्ट आपल्या इकडे पुष्कळांना कळलेली नाही. केतकरांची सावधगिरी न बाळगल्यामुळे मॅक्समुल्लरसाहेबांनी योजलेल्या 'आर्य' शब्दाने जो धुमाकूळ मांडला आहे तो तर आज जगाला उघड दिसतच आहे. यावरून डॉ. केतकर यांची सूक्ष्म व शोधक दृष्टी दिसून येते.
 'Hindustan : its Formation and Future' ह्या निबंधात केतकरांनी असेच एक परिशिष्ट धर्म ह्या संस्थेचे शास्त्रीयष्ट्या कसे परीक्षण करावे ह्याविषयी लिहिले आहे. यांत निरनिराळ्या देशांतील संप्रदायांचे परीक्षण पृथक पृथक करणे कसे आवश्यक आहे आणि धर्म कशाला म्हणावे व कशाला म्हणू नये ह्यासंबंधी विवेचन केले असून, ख्रिस्ती धर्म व हिंदू धर्म ह्या दोन्ही शब्दांत 'धर्म' शब्दाचा अर्थ निरनिराळा असल्यामुळे प्रत्येक समाजात धर्माचे स्वरूप काय हे निश्चित करण्याची आवश्यकता कशी उत्पन्न होते, हे दाखवून दिले आहे. एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा विचार करताना झटकन मोठ्या तत्त्वावर येणे अथवा उलटपक्षी, मोठ्या तत्त्वाचा ऊहापोह चालला असता एखादी लहानशी गोष्ट लक्षात घेणे, म्हणजे विचार सरळ एक दिशेने न जाता त्यांचे इतस्तत: परिभ्रमण होणे, ही क्रिया दुस-या एखाद्या शास्त्राला बाधक झाली असती; परंतु समाजशास्त्राला ती फारच उपयुक्त अशी झाली आहे. ह्या क्रियेमुळे केतकरांचे विचार विस्कळीत, अफाट व क्वचित हास्यास्पदही वाटतात; परंतु त्यांच्या लेखनात कंटाळवाणेपणा कधीच वाटत नाही. त्यांचे लेखन नेहमी सूचनागर्भ असते,