पान:आमची संस्कृती.pdf/78

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / ७१

पाहिजेत, अशी पुष्कळांची लोकशाही राज्याबद्दल कल्पना असते. ही लोकशाही नसून सबंध समाजाचा अध:पात आहे. जेथे जेथे समाजकल्याणाचे नाव पुढे करून व्यक्तींची तोंडे बंद करतात, देशहिताची सबब पुढे करून एखाद्या जमातीवर भयंकर अन्याय केला जातो तेथे खास समजावे की, लोकशाही बुडून अधिकारशाहीला आरंभ झाला. ही अधिकारशाही राजाची असो की राज्यकर्त्या पुरुषांची असो, तिला मान तुकवली की विचारस्वातंत्र्य नाहीसे झालेच म्हणून समजावे. ते गेले म्हणजे समाजाचा विनाशकाल जवळ आला म्हणून मानण्यास हरकत नाही.
 अधिकारयोगासारखी बुद्धी व शील नष्ट करणारी दुसरी गोष्ट नाही. कोठच्याही तव्हेचा अधिकार नसताना जी माणसे उदार असतात, सहकार्याने वागतात, लोकांच्यावर विश्वास ठेवतात, आर्जवी असतात, तीच अधिकारावर आली म्हणजे स्वजनद्रोह करतात, उघड करावयाच्या गोष्टी पडद्याआड करू लागतात. ख-याखोट्याची कदर बाळगीत नाहीत. ही गोष्ट फक्त राजकारणी लोकांतच दिसते असे नसून सर्वच सामाजिक बाबींत दिसते. एखादा अधिकारी माणूस जाणूनबुजून अपकृत्य करू लागला म्हणजे काहीजण लोभाने व काहीजण भीतीने गप्प बसतात. ह्या अभेद्य भिंतीवर आपटून तिच्याशी झगडा देण्याची हिंमत करणारे आगरकरांसारखे महात्मे फार थोडे असतात.  आगरकरांचा आणखी एक अमोल गुण म्हणजे त्यांचा दुर्दम्य आशावाद. त्यांच्यासारखा झगडा सबंध आयुष्यात कधीही देण्याचा प्रसंग मजवर न येऊनही मी निराशावादी बनत चालले आहे. आयुष्यात जे लहानमोठे प्रसंग पाहिले त्यांवरून असे वाटू लागले आहे की, न्याय व सत्य हे शब्द गरिबांना झुलवण्यासाठी श्रीमंतांनी व सत्ताधीशांनी उत्पन्न केलेले आहेत. त्या दोन्ही गोष्टी गरिबांना, वशिला नसलेल्यांना अप्राप्त आहेत व श्रीमंतांना त्यांची जरूरी नाही. पण आगरकरांचा दृढ विश्वास होता की, आज नाही उद्या आपण जिंकणारच. कितीही गरीब, अपमानित, लाथाडलेला असलो तरी माझ्या दृष्टीला जे योग्य असेल त्यासाठी मी झगडणारच व त्यात मी खासच विजयी होईन, हा भरवसा त्यांनी कधी सोडला नाही. आगरकर ज्याला धर्म म्हणत त्याच्या बुडाशी ही भावना होती. ती त्यांना जशी स्फूर्ती देई तशीच अविरत झगडण्याचे बळ देई व