पान:आमची संस्कृती.pdf/77

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


७० / आमची संस्कृती

 अधिकारशाही विचारस्वातंत्र्य नाहीसे करते
 हे लोक परकी जुलमाविरुद्ध लढावयास वाघ होते. पण स्वकीयांनी केलेल्या जुलमाविरुद्ध लढण्याच्या कामी मिंधेपणामुळे, भीतीने, अत्यादरामुळे म्हणा वाटले तर, त्यांना अवसान नाही. 'बुद्धिमंदिरात सत्याचा दीप प्रकाशित झाल्याबरोबर वृत्ती आनंदमय होऊन... ज्याचे देहावसान सुटते असा एखादा महात्माच आईबापांची, गणगोताची, धनद्रव्याची, जातीची, देशाची किंवा समग्र मनुष्यतेची पर्वा न ठेवता... अमर्याद प्रेरणाबलाच्या भरवशावर हवे तेवढे महत्कृत्य हाती घेऊन ते तडीस नेतो. सामान्य मनुष्यांनी अशा नरवरांचे आश्चर्य करावे, पूजन करावे, स्मरण करावे, शिष्यत्व करावे - ते पुढे म्हणतात- ‘पण अनुकरण करू नये' - मी म्हणते शक्य तर अनुकरण करावे. अन्याय झाला, मोठा अन्याय झाला अशी जर खात्री आहे तर ज्यांनी तो केला ते आप्त म्हणून त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न करू नये, ही केवढी लाजिरवाणी गोष्ट! परकीयांचे राज्य गेले, आता आपले राज्य आहे ह्या एका भ्रांतीमुळे आमच्यातली अन्यायाची चीडच नाहीशी होऊ लागली आहे. हाच आदर्श तरुण पिढीपुढे राहिला तर तिला विचाराचे स्वातंत्र्यच नाहीसे होईल. व्यक्तिपूजेमुळे काय अनर्थ झाला ह्याचा पाढा सर्व जगाला कळावा म्हणून रशियन पुढारी कंठरवाने ओरडत आहेत. स्टालिन, हिटलर व मुसोलिनी हे। महान देशभक्तच होते, पण त्यांच्या अनुयायांच्या भेकडपणामुळे ते सर्वसत्ताधीश बनले व सत्तेमुळे भय उत्पन्न होऊन मी म्हणेन ते सत्य व मी देईन तो न्याय अशी त्यांची अवस्था झाली. आगरकरांच्या निबंधांत व आचरणात सध्याच्या पिढीसाठी काही मोठा धडा असला तर हाच आहे. तुम्ही किती मोठे असला तरी मनुष्यच आहात. तुम्ही देशभक्त आहात तसा मीही आहे, मलाही बुद्धी आहे, ही जाणीव अहोरात्र मनात बाळगून त्याप्रमाणे वर्तन झाले नाही तर स्वातंत्र्य उपभोगण्यास आम्ही पात्र राहणार नाही. लोकशाही राज्य म्हणजे बहुसंख्यांचे अल्पसंख्यांकांवर राज्य असा अर्थ पुष्कळ करतात पण तो अर्थ कोणालाही संमत नाही. पुष्कळांच्या सुखापायी एकाला अन्याय झाला तरी हरकत नाही. चार [ला तरी हरकत नाही; चार-दोन लोक मेले तरी चालेल पण शांतता प्रस्थापित झाली म्हणजे झाले: अमक्या पार्टीचे सदस्य म्हटले की स्वत:ची बुद्धी व भावना व सदसदविवेक बाजूला ठेवली