पान:आमची संस्कृती.pdf/69

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / ६३

ते ते हिंदू राजे आणि सारे हिंदू जगत मोठ्या प्रौढीने आत्मस्तुती करीत असे. अशा ह्या गोमुखी हिंदू धर्माच्या परधर्मसहिष्णू अनुयायांकडून त्या व्याघ्रमुखी मुसलमानी समाजाचे नि:शेष निखंदन केले जाण्याची लवलेशही शक्यता नव्हती हे काय सांगावयास हवे?
 ती अधर्मसहिष्णुता होती ।
 परधर्मसहिष्णुता! आणि हा सदगुण! जेथे तो परधर्म आपल्या स्वधर्माशी सहिष्णुतेने वागत असेल तेथे त्या परधर्माशी सहिष्णुतेने वागणे हा सदगुण असू शकेल; परंतु ज्या मुसलमानांचे महंमद गझनीपासूनचे सुलतानामागून सुलतान, शहा, बादशहा आपल्या तक्तावर बसताना ‘इस्लाम धर्माच्या गौरवार्थ काफरांच्या हिंदू धर्माचा उच्छेद करून टाकणे हाच माझा धर्म आहे, हीच माझी प्रतिज्ञा आहे.' अशी शपथ घेऊन ‘तक्तावर' बसत आले आणि अशी अत्याचारी धार्मिक आक्रमणे हिंदूंवर एक सहस्र वर्षे करीत आले, त्यांच्या भाषांतील त्या तशा मुसलमानी धर्माशी, त्या तशा परधर्माशी परधर्मसहिष्णुतेने वागणे म्हणजे स्वधर्माच्या गळ्यावर स्वहस्ते सुरा चालविणे होते. ती परधर्मसहिष्णुता नसून अधर्मसहिष्णुता होती. ती सहिष्णुता नसून तो षंढपणा होता. पण हे सत्य एक सहस्र वर्षांच्या अघोर अनुभवांनंतरही त्या काळच्या हिंदूंच्या ध्यानी आले नाही. ते, तशा धर्माशीही सहिष्णुतेनेच वागणे हा स्वधर्म समजत. हिंदू जातीचा भूषणभूत नि विशिष्ट ‘सदगुण' समजत!
 हे हिंदू जाती! तुझ्या अध:पाताला कारणीभूत झालेल्या दुर्गुणांपैकी प्रमुख दुर्गुण जर कोणते असतील तर हे तुझे सदगुणच होत!!
 अहिंसा, दया, शत्रुस्त्रीदाक्षिण्य, शरणागत शत्रूना अभयदान, क्षमा वीरस्य भूषणम', परधर्मसहिष्णुता इत्यादी सदगुणांच्या, देशकालमात्राचा विवेक न करता, तू केलेल्या नेभळ्या नि आंधळ्या अवलंबनानेच तुझा त्या सहस्रवर्षव्यापी हिंदु-मुसलमान- महायुद्धामध्ये धार्मिक क्षेत्रात असा भयंकर पराभव झाला. कारण- पात्रापात्र विवेकशून्य।आचरिला जरी सदगुण।तो तोचि ठरे दुर्गुण।सदधर्मविघातक।।'

- १९५८