पान:आमची संस्कृती.pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / ६१

पाहिलेले आहे. गाडीचा आकार सुधारून जोखड व गाडीची पुढची बाजू यांत भरपूर अंतर ठेवण्याबद्दल लोकांचे मन वळवले तर बैल दुवाच देतील. गोमांस खाणा-यांच्या प्रदेशांत गुरांना जी वागणूक मिळते ती भारतातील हिंदू कधीही देत नाहीत. भारतात गोधन इतके निकृष्ट आहे की, गोमांसखाऊ विलायतेत जेवढे दूध दर गाईमागे मिळते त्याच्या एकचतुर्थांशही येथे मिळत नाही. बैलांची काम देण्याची शक्तीही कमी असते. गुरे जास्त व चारा कमी म्हणून गुरांना चांगले खाणेपिणे क्वचितच मिळते. गंगा व ब्रह्मपुत्रा ह्या नद्यांच्या खो-यांतून नुकताच माझा एक प्रवास झाला. गुरांचे शेकडो कळप वाटेत भेटले; पण त्यांतील फार थोडी गुरे सशक्त व पुष्ट दिसली. बाहेर हाडे निघालेली, थकली-भागलेली गुरेच अधिक. हा उन्हाळा तरी काढतील की नाही, असे त्यांना पाहून वाटले. जेथे जेथे अशा गुरांचे कळप, तेथे तेथे शेजारच्या वृक्षांवरून मोठमोठी गिधाडे बसलेली पाहून अंगावर काटा आला. एखादे दुसरे गुरू तरी ४/५ मैलांत रोज मरतेच. मेजवानी मिळण्यासाठी फक्त उंच वृक्षावर वाट पाहावयाची एवढेच ह्या गिधाडांचे काम. अशी भुकेने व रोगाने मेलेली जनावरे हिंदुस्थानात खूपच असतात. त्यांच्या कातड्यांपासून केलेल्या पादत्राणांना ‘अहिंसक' चपला म्हणतात. ही अहिंसेची चेष्टा की जाणूनबुजून स्वीकारलेले औदासिन्य? इतर धर्माचे लोक गुरे कसाईखान्यात एका घावाने मारतात. आम्ही हिंदू त्यांना उपाशी-तापाशी ठेवून मारतो. कायद्याने पहिल्या त-हेच्या वधाला बंदी व्हावी आमचे हे मागणे व त्यामुळे हिंदुधर्मसंरक्षण होईल ही आमची कल्पना! खरोखर ह्या प्रचाराला बळी पडण्याइतके आपण खुळे झालो आहोत का?
 हट्टाग्रह का?
 गाय, म्हैस, बैल, घोडा, उंट, शेळ्या, मेंढ्या वगैरे जनावरे फार उपयुक्त आहेत. ते गाड्या ओढतात, नांगर ओढतात, दूध व मांस असे सकस अन्न भरपूर प्रमाणात पुरवतात, त्यांच्या कातड्यांपासन अयोग्य उपयुक्त व नित्याच्या वापरांतल्या वस्तू होतात. त्यांच्या खुरशिंगांपासून सरस बनतो. तोच सरस शुद्ध करून त्यात निरनिराळे रंग व सुगंधी द्रव्ये घातली म्हणजे बाजारात मिळणारी जेलीची भुकटी होते. त्यांच्या हाडाचा