पान:आमची संस्कृती.pdf/66

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ५९

सरकारचे व कित्येक सार्वजनिक संस्थांचे प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नांना हातभार लावून सर्वांना दूध मिळावे असा प्रयत्न करण्याचे टाकून दुधाचा पुरवठा व दूध घेण्याची ऐपत ह्या गोष्टीशी ज्यांचा संबंध नाही अशा गोवधबंदीच्या चळवळीत सामर्थ्य खर्च करणे म्हणजे वेळेचा अपव्यय व बहुजन समाजाची दिशाभूल जाणूनबुजून करणे होय.
 ज्या देशांतून सरसकट गोवध होतो, जेथले गरीबगुरीब गोमांस खातात, तेथे गाईचे दूध उत्तम मिळते व त्याची किंमतही मुंबई-पुण्यास द्यावी लागते त्यापेक्षा कमी पडते. गोवधाचा दूध-पुरवठ्याशी संबंध मुळीच नाही.
 गाईम्हशीच्या दुधाचा उल्लेख आला म्हणून थोडे विषयांतर करून एक गोष्ट नमूद करते. गाईचे दूध मुलांना मानवते म्हणून ते म्हशीपेक्षा चांगले हेही एक अजब तर्कट आहे. म्हशीच्या दुधाची साय काढली व त्यात पाणी घातले तर मुलांना ते उत्तम मानवते व प्रौढांना तर म्हशीचे दूध चांगलेच मानवते. म्हशीचे दूध गोडीने व कसाने गाईच्या दुधापेक्षा जास्त चांगले असते. त्याचे दही पण गाईच्या दह्यापेक्षा घट्ट व रुचकर असते. शिवाय गाईला होणारे बरेचसे रोग म्हशीला होत नाहीत. युरोपमध्ये काही प्रदेशांतून गाईंना फार मोठ्या प्रमाणात क्षयरोग झालेला असतो व ते दूध प्यायल्याने माणसालाही तो रोग होतो, म्हणून पाश्चराइज्ड (जंतुरहित) न केलेले असे खेडेगावचे दूध पिऊ नका असे सांगणाच्या धोक्याच्या सूचना प्रजेला देतात. स्वित्झर्लंडमध्ये गाई बऱ्याच प्रमाणात अशा रोगाने पछाडलेल्या असतात, म्हणून बहुतेक दुधाचे चीझ व चॉकोलेट बनवून टाकतात. कारण ह्या दोन पदार्थाच्या कृतींत रोगजंतू मरून जातात. तेव्हा गोदुग्धाच्या धारेत वाहवून न जाता उत्तम सकस दुधाचे रांजणच जणू अशा आपल्याकडील ओबडधोबड, काळ्या म्हशीचेही स्मरण ठेवले तर कृतज्ञता व्यक्त केल्यासारखे होईल.

एक राजकीय पवित्रा

हिंदच्या देवळातील काही प्रकार वर वर्णन केलेच आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देवळाच्या आवारात मोकाट सुटलेले गाईबैल व कुत्री चालतात, पण काही जातींची माणसे मात्र आलेली चालत नाहीत.