पान:आमची संस्कृती.pdf/65

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५८ / आमची संस्कृती

अशी की, ह्या ब्रह्मचर्याच्या काळात सर्वच तऱ्हेचे मांस वर्ज्य होते, फक्त गोमांस वर्ज्य असे नव्हते.

धर्म कमकुवत करू नका!

 एकंदरीनेच मांस खाण्याविषयी ब्राह्मणांचे मत कसे होत गेले व त्यातही गोमांस निषिद्ध कसे व कधी झाले हे नीट सांगता येत नाही. फिलाडेल्फिया विद्यापीठात प्रो. ब्राऊन म्हणून एक संस्कृत पंडित आहेत. त्यांनी ह्या विषयावर लिहिलेला एक लेख नुकताच पाहण्यात आला. त्यांतही प्रो. महाशयांना ह्या प्रश्नाचा नीटसा उलगडा झाला नाही, असे दिसते, पण त्यात त्यांनी असे दाखवून दिले की, हा निषेध असूनही हिंदू भारतात निरनिराळ्या जमाती गोमांस भक्षण करीत असे उल्लेख सापडतात. ब्राह्मणांना एकंदर मांसभक्षण निषिद्ध झाले ते बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा पाडाव करता करता त्यांतील काही तत्त्वे सनातन्यांनी स्वीकारली म्हणून झाले, की मध्ययुगात जैन मताचा प्रसार झाला त्यामुळे झाले, हेही ठामपणे सांगता येत नाही. ह्याबाबत एक लक्षात ठेवणे जरूर आहे की, हिंदुस्थानाबाहेरील बुद्धधर्मीय मांसभक्षण- गोमांसभक्षण धरून- करतात. काही कारणामुळे ब्राह्मणांना मांसभक्षण व त्यातूनही गोमांसभक्षण निषिद्ध झाले; पण निषेध हा हिंदू धर्माचा गाभा असे मानता येणार नाही व हिंदू धर्माच्या नावाखाली गोवधबंदीची चळवळ करणे म्हणजे लोकांची दिशाभूल करणे व हिंदू धर्मात एक निषेध दृढमूल करून तो धर्म आणखीच कमकुवत करणे होय.

दूधपुरवठा नि गोवध

 गोवधामुळे भारतातील लोकांना पुरेसे दूध मिळत नाही असाही एक सर्वथैव खोटा प्रचार गेल्या महाशिवरात्रीला झाला. भारतात निम्मे लोक म्हशीचे दूध पितात; त्यांचे दुग्धपान युरोपाप्रमाणे सर्वस्वी गाईवर अवलंबून नाही. शिवाय ज्यांना दूध मिळत नाही त्यांना खायला व प्यायलाही नीट मिळत नाही. सर्वांना दूध घेण्याची ऐपत आहे व इच्छा आहे पण पुरेसा पुरवठा नाही अशी परिस्थिती असती, तर एक महत्त्वाचे अन्न म्हणून त्याचे रेशनिंग करण्याची मागणी पुढे आली असती. जे दूध पीत नाहीत ते दारिद्र्यामुळे. त्यांना- निदान गरीब लहान मुलांना- दूध मिळावे म्हणून