पान:आमची संस्कृती.pdf/63

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

५६ / आमची संस्कृती


गोवधबंदीची चळवळ दडपणाची!
 ख्रिस्ती व मुसलमान, विशेषत: मुसलमान, लोकांचे अनुकरण करून आततायीपणा करण्याकडे मात्र प्रवृत्ती वाढू लागली आहे. वेदवाङ्मय, इतिहास व पुराणे हे जसे आमचे धर्मग्रंथ आहेत तसेच ते जुन्या चालिरीती व इतिहास ह्यांचे कोठार आहेत. भारताच्या प्राचीन इतिहासाचे संशोधन करावयाचे तर ह्या ग्रंथांचा फार काटेकोरपणे अभ्यास करावा लागतो. त्यात सारखी भर पडत गेली आहे. ती भर कोणती व पूर्वीचा शक्य तितका जुना ग्रंथ कोणता, हे शोधून काढणे आवश्यक आहे. अशा अभ्यासात पूज्य दैवते व व्यक्ती ह्यांच्या चरित्रावर उलटसुलट टीका होणे अपरिहार्य असते. अशा वेळी भावना दुखावल्याचा हलकल्लोळ करणे रास्त नाही. जुन्या पंडितांचे ग्रंथ, स्वमतमंडन व परमतखंडन करताना त्यांनी केलेली विधाने पाहिली म्हणजे कसल्याही तऱ्हेचे पावित्र्यविडंबन करण्याचे त्यांनी ठेविले नाही हे दिसून येईल. चीड येईल असे लिखाण लिहिण्याच्या बाबतीत ह्या प्रतिवादी भयंकर पंडितांच्या मानाने हल्लीची पिढी कच्चीच आहे असे दिसून येईल. जैनांनी सनातन्यांच्या इतिहास व पुराणग्रंथांचा जो विचका केला आहे तितका दुसऱ्या कोणीच केला नसेल. शैवांनी वैष्णवांची व वैष्णवांनी शैवांची जी निंद्य चेष्टा केली आहे तितकी इतर धर्मीयांनीसुद्धा हिंदूची केलेली नाही.
 ह्या गोष्टी येथे सांगण्याचे कारण असे की, हिंदुत्वाचा अभिमान धरणारे लोक, काही अपवाद वगळल्यास, स्वत:ची शुद्धी न करता इतरावर व्यर्थ दडपण आणू पाहत आहेत. गोवधबंदीची चळवळ ही अशा चळवळींपैकी आहे. तिला तर्काचा, इतिहासाचा, धर्माचासुद्धा आधार नाही. जे हिंदू राजे धर्मरक्षणार्थ प्राणपणाने लढले व ज्यांच्या हातात राज्यसत्ता होती, त्यांनीही सरसकट गोवधबंदी अमलात आणली नाही. शिवाजी महाराजांच्या राज्यात भररस्त्यात गाय मारू देत नसत; गाय मिरवणुकीने नेऊन मारू देत नसत; पण मुसलमानांनी गाय मारावयाची नाही व गोमांस खावयाचे नाही अशी बंदी नव्हती. खुद्द पुण्याला पेशव्यांच्या ब्राह्मणी राज्यातही संपूर्ण गोवधबंदी होती असा खात्रीदायक परावा सापडत नाही. मग आताच गोवधबंदीची चळवळ का उसळली! हिंदू धर्माबद्दल काही विशेष आस्था वा काही नवी मानवी मूल्ये ह्या