पान:आमची संस्कृती.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ५७

आंदोलनाच्या बुडाशी आहेत असे वाटत नाही. जी तरुण मंडळी ह्यांत पडली आहेत ती सद्भावनेनेच कार्य करीत असणार, पण त्यांनी शांतपणे विचार करावा अशी त्यांना आग्रहाची विनंती आहे.

गोमांसभक्षणाचा इतिहास

 गोमांसभक्षणाचा इतिहास मोठा उद्बोधक आहे. गाय, बैल, शेळ्या व मेंढ्या ह्यांचे कळप पाळणारे बहुतेक लोक ह्या ना त्या स्वरूपात ह्या प्राण्यांचे मांस खातात व त्यांचे कातडे पांघरण्यासाठी, पादत्राणे करण्यासाठी, वाद्या करण्यासाठी वगैरे नाना तऱ्हेच्या उपयोगासाठी वापरतात. पूर्वी आर्य भारतात आले तेव्हा त्यांच्याजवळही अशा तऱ्हेचे कळप होते व त्या प्राण्यांचे दूध, मांस व कातडे यांचा उपयोग ते सर्रास करीत असत. उष्ण प्रदेशात मांस लवकर नासते व म्हणून जनावर मारले की, शक्य तितक्या लवकर ते खाऊन संपवावे लागते. शेळी मेंढीसारखे जनावर ५-१० जणांना संपवता येते; पण गायबैलांचे मांस संपवायला चांगली ५० माणसे लागतील. त्याचप्रमाणे शेळ्या-मेंढ्या एकाएका मालकाजवळ खंडोगणती असतात, तर गुरे १० नीच मोजावी लागतात. युरोपातील थंड प्रदेशात, विशेषतः हिवाळ्यात मांस आठवडेच्या आठवडे टिकू शकते. एखादे गुरूं मारून ठेवले तर एक कुटुंब कित्येक दिवस त्यावर जगू शकेल. भारतातील उष्ण हवेत ते शक्य नव्हते त्यामुळे गुरू मारणे म्हणजे एक मोठा मेजवानीचा प्रसंग समजला जाई व कोणी थोर ऋषी आले तरच गाईचे कोवळे मांस शिजवले जाई. ब्राह्मणांचा सर्वांत मोठा सन्मान करणे किंवा पाहुण्याचा सन्मान करणे म्हणा- ह्या विधीला मधुपर्क असे नाव आहे व त्यांत गोमांस अवश्य म्हणून उल्लेख आहे. आर्य पादत्राणे वापरीत व ती गाईबैलांच्याच कातड्याची असत. म्हैस बाळगणे जुन्या आर्यांना ठाऊक नव्हते. प्राचीन आर्याचे पंचगव्य (गाईपासून झालेले पाच पदार्थ) म्हणजे दूध, दही, तूप, लोणी व मांस असे होते.

 एकंदरीनेच आर्यांना मांस वर्ज्य नव्हते. मुंज झाल्यापासून ब्रह्मचर्याची दीक्षा सुटेपर्यंत आयुष्य अतिशय साधेपणे व कष्टाने घालवावे असा नियम होता. तेवढ्या वेळात ज्या गोष्टी वर्ल्स होत्या त्यांत मध, मांस वगैरे खायला रुचीकर लागणारे पदार्थ होते. लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट