पान:आमची संस्कृती.pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ५५


मशीद व चर्च ह्यांना मुसलमान व ख्रिस्ती धर्मात जे विशिष्ट स्थान आहे ते देवळाला हिंदू समाजात नाही. काही का असेना, हिंदूची देवळे शेकडोंनी फुटली हे खरे. आता तरी आपण जागरूकपणे देवळांचे पावित्र्य ठेवण्यासाठी झटतो म्हणावे तर तेही नाही. कुठच्याही लहानमोठ्या देवळांत जा, स्वच्छता, प्रसन्नता व पावित्र्य ही अपवादानेच आढळतात. सर्व त-हेच्या बेवारशी व रोगी जनावरांचे वसतिस्थान म्हणजे हिंदू देवळांचे आवार झाले आहे. पुष्कर सरोवराच्या रम्य परिसरात एक प्रसिद्ध देऊळ ब्रह्मदेवाचे आहे. तेथे देवळाभोवतालच्या ओव-यांवरील गच्चीवर सर्व पुजारी व यात्रेकरू शौचविधी उरकतात! पूर्वी देवळांना भव्य आवारे असत, देवळाला वाट रुंद ठेवलेली असे. हल्ली देवळांची आवारे व शेजारील रस्ते पुजारी व दुकानदार ह्यांनी हळूहळू पुढे सरकून इतकी बळकावली आहेत की, देवळात जाण्याची वाट अरुंद बोळासारखी झालेली आहे. काही मंदिरांत तर पुजा-यांच्या किंवा भोप्यांच्या घरांतूनच जावे लागते. देवाचे आवार पूर्वी केवढे होते हे शोधून ते परत तेवढे करवले तर एक मोठे समाजकार्य होईल.
 हिंदू देवळांतून व घरांतून भजन म्हणून एक कार्यक्रम असतो. गायन व नृत्य हे ईश्वरसेवेचे एक अंग फार प्राचीन काळापासून समजले जाते. अजूनही काही मंदिरांतून सकाळी व संध्याकाळी वीणावादन व गायन चालते. चिदंबरला रोज सकाळ-संध्याकाळ उत्कृष्ट भक्तिगीते गाइली जातात. जगन्नाथाच्या मंदिरात जयदेवाच्या गीतगोविंदाचा काही भाग रोज म्हटला जातो. अशा ठिकाणी मन काही क्षण का होईना, देवाच्या पायाशी स्थिरावते; पण कित्येक ठिकाणी भजनाच्या नावाखाली गायनाची, वाद्यांची व ज्या भक्ताने गीते रचिली त्याची विटंबना मात्र झालेली आढळते. प्रत्येक भक्ताच्या हातात टाळासारखे कर्कश वाद्य असते. त्याच्यावर आवाज चढवावा लागतो म्हणून प्रत्येक जण गळा फोडून ओरडत असतो. माधुरीचा सर्वथैव लोप होऊन कर्कश, विसंवादी नाद मात्र उमटत असतो. देव बहिरा आहे अशी ह्या लोकांची ठाम समजूत झालेली असते. अशा भजनाने आसपासच्या वीस-पंचवीस घरांना त्रास होतो. ही दुष्ट प्रथा बंद पाडून सुस्वर सामुदायिक भजन करणे शक्य आहे. त्यामुळे हिंदचे दैवतपूजन जास्त मंगल होईल, पण तिकडे कोणी लक्ष देत नाही. एवढेच नव्हे तर अशी टीका करणारा नास्तिक व पाखंडी समजला जातो.