पान:आमची संस्कृती.pdf/49

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

४२ / आमची संस्कृती


उणीवा व खाचखळगे

वन्यांसाठी व मागासलेल्यांसाठी जी खास तरतूद केली आहे ती योग्यच आहे; पण त्यात काही उणीवा व काही खाचखळगे राहिलेले आहेत.
मुख्य उणीव म्हणजे वन्य व वन्येतरांचे संबंध काय आहेत, भारतात वन्यांचे स्थान काय करावे वगैरे मूलभूत प्रश्नांवर ठाम विचार झालेला नाही. दुसरे म्हणजे वन्य व मागासलेले कोणाला म्हणावे हा बिकट प्रश्नही अजून नीट सुटलेला नाही. ह्या मूलभूत प्रश्नांवरील गोंधळामुळेच इतर. गोंधळ निर्माण झालेले आहेत.

वन्य-वन्येतरांचे संबंध

युरोपीय लोक १५ व्या ख्रिस्त शतकापासून जगाच्या निरनिराळ्या भागांत पसरले तेव्हा पहिल्याने त्यांचा वन्य लोकांशी संबंध आला. गोरी कातडी, कापड कापून, बेतून शिवलेले अंगभर कपडे, झपाट्याने वाढत जाणारे विज्ञान व यंत्रयुगाची सुरुवात व सर्वांत वर कडी म्हणजे विजिगीषु, असहिष्णु, एकेश्वरी पंथ, ह्यामुळे युरोपियांना वन्य जमाती आपल्यापासून सर्वथा भिन्न व नीच पायरीवर आहेत असे वाटले; कित्येक युरोपियाना पारध करून सबंध जमातीच्या जमाती नष्ट करून टाकल्या. ज्या काही उरल्या त्यांना आपल्या धर्माची फक्त दीक्षा दिली; पण इतर बाबतीत त्यांना युरोपीय समाजापासून अलिप्त ठेवले. युरोपियांचे जेव्हा वन्यांवर आक्रमण झाले तेव्हा युरोपीय आक्रमक व वन्य ह्या दोन समाजांच्या संस्कृतीत फार मोठे अंतर होते. दोन्ही जगाच्या निरनिराळ्या भागांत अलिप्तपणे राहत होत्या. एक समाज भौतिक संस्कृतीत व ज्ञानात झपाट्याने पुढे गेलेला होता तर एक अश्मयुगीन संस्कृतीत स्थायिक होता. त्यांची जेव्हा भेट झाली तेव्हा दोघांमध्ये एका मानव्याखेरीज काही समान नव्हते व वन्य मानवच आहेत हेही पहिल्या आक्रमकांना बरेचदा मान्य नव्हते. ह्याउलट पतामधील वन्य-वन्येतरांचे संबंध गेल्या तीन हजार वर्षांचे तरी निदान आहेत.