पान:आमची संस्कृती.pdf/50

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ४३

दुर्लघ्य भेदच नाहीत

आर्यांच्या पशुपाल टोळ्या जेव्हा भारतात आल्या तेव्हा त्यांना ठिकठिकाणी पसरलेले अनार्य लोक भेटले. ह्या अनार्यांचे संस्कार, राहणीची पद्धती, रूप वगैरे आर्याहून भिन्न होते. संस्कृतीने अनार्य आर्यांपेक्षा कमी होते असे म्हणण्यास काही पुरावा नाही. आर्यांच्याजवळ पशू व चाके असलेली वाहने होती. शेती करणाच्या स्थायिक लोकांवर धाड घालून त्यांचा पराभव करणे पाठीवर बिऱ्हाड असलेल्या भटक्या टोळ्यांना शक्य झाले. आर्य-अनार्यांचा संघर्ष पिढ्यानपिढ्या चालत आला असला पाहिजे. या संघर्षातच संस्कृतिसंगमाची बीजे होती; शरीरसंकराचीही होती. या कालांत भव्य नवी संस्कृती निर्माण होत होती व त्या निर्मितीत आर्य व अनार्य या दोघांचाही भाग होता. आर्य भाषा इतरांचे बरेच शब्द घेऊन उत्तर भारतात सर्वांची भाषा बनली. आर्यांच्या जुन्या देवांपैकी काही नष्ट झाले. काहींचे नामरूप बदलले व काही अगदी नवी दैवते भारतीय धर्मात शिरली. शिस्नदेवा: म्हणून ज्या पूर्वेच्या लोकांची ऋग्वेदात अवहेलना आहे त्यांचाच देव शंकर म्हणून भारताचे एक आवडते व पूज्य दैवत होऊन बसले. तांदूळ हे अनार्याचे धान्य भारतीयांचे आवडते खाद्य झाले. वेदांत न सापडणाच्या स्वर्ग, नरक व पुनर्जन्म या कल्पना धर्माच्या आधारस्तंभ झाल्या. आर्यअनार्याचे पूर्ण मिश्रण झाले, पण काही लोक आर्यांच्या उपद्रवापासून जरा दूर-दुर्गम डोंगरांत वा जंगलांत जाऊन राहिले. त्यांनी आपली स्वतंत्रता टिकवली, पण ते सांस्कृतिकट्या मागासलेले राहिले. तरीही त्यांच्या जंगलात ब्राह्मण, जैन व बौद्ध लोकांचा प्रवेश होत होता; व इकडच्या कल्पना तिकडे जात होत्या. अशा परिस्थितीत भारतीय वन्य समाज हा वन्येतर भारतीयांपासून दुर्लंघ्य सांस्कृतिक भेदाने विभागलेला आहे असे म्हणणे व त्या आधारावर वन्यांना इतर भारतीयांपासून वेगळे ठेवणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करणे आहे.
वन्येतर भारतीयांमध्ये असे कितीतरी लोक आहेत की ज्यांची सांस्कृतिक पायरी वन्यांपेक्षा खात्रीनेच वरची नाही. तेही निर्वस्त्र, निरक्षर, निर्धन जीवन जगत आहेत. वन्य जमाती व त्यांचा प्रदेश हे सर्वस्वी भारतीय आहेत व इतर भारतीयांशी त्यांचे जीवन जितक्या लवकर निगडीत करता येईल तितके वन्यांचे व वन्येतरांचे कल्याण होईल.