पान:आमची संस्कृती.pdf/48

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ४१


कम्मरा ही जमात कोयांशेजारी राहते व अस्पृश्यासारखी गणली जाते. बहुतेक जाती निकृष्ट तऱ्हेची शेती करतात (चेंचू, बोंडो, हो, भिल्ल). काही उत्कृष्ट शेती करतात (मुंडा, खोंड, संथाळ, वारली, कोया वगैरे). एखाददुसरी पशुपालन करते. निलगिरीतील तोडा म्हशी बाळगतात, शेती बिलकुल करीत नाहीत. बहुतेक सर्वच वन्य जमाती शिकारीत व जनावरांचा माग काढण्यात निष्णात असतात. हिंदू संस्कृतीची दाट छाया, त्यांची भाषा, संस्कार व चालिरीती ह्यांवर पसरलेली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्या संस्कारांची व आचारविचारांची छाया हिंदू संस्कृतीवर पसरलेली आहे.

सरकारी व्यवस्थेचे स्वरूप

वन्यांच्या विकासासाठी व संरक्षणासाठी आपल्या घटनेत काही खास योजना केलेल्या आहेत. कित्येक कोटी रुपये विकासासाठी वेगवेगळे ठेवलेले आहेत. केंद्रीय लोकसभेत त्याचप्रमाणे निरनिराळ्या राज्यांच्या सभेत त्यांच्यासाठी खास राखीव जागा ठेवल्या आहेत. सर्व भारतभर वन्यांसाठी ज्या सोयी केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी नीट होते की नाही ते पाहून त्यांच्या परिस्थितीचे वृत्त दरवर्षी राष्ट्राध्यक्षांना सादर करावे लागते. हे सर्व करण्यास एका खास अधिकाऱ्याची नेमणूक झालेली आहे. त्याच्या हाताखाली संबंध भारतासाठी पाच प्रादेशिक अधिकाऱ्यांची नेमणूक झालेली आहे. ह्याशिवाय एक मध्यवर्ती व दर राज्यात एक ह्याप्रमाणे वन्य व मागासलेल्या जमातीच्या उन्नतीसाठी मंडळे आहेत. प्रत्येक राज्यात मागासलेल्या जमातींच्या कल्याणासाठी एक निराळा अधिकारी व त्याच्या हाताखाली बरेच दुय्यम अधिकारी असतात. आसाम व त्रिपुरामधील काही प्रदेश राज्यांतून तोडून खासे केंद्राच्या ताब्यात ठेवला आहे व केंद्रातर्फे तेथील सर्व राज्यकारभार चालतो. पूर्वी वन्यांचा प्रदेश त्या त्या प्रांतांच्या गव्हर्नराच्या खास देखरेखीखाली असे व राज्य-विधान सभेत त्याबद्दल काही करता येत नसे. आता ती परिस्थिती बदललेली आहे व साधारपणे जो वन्य प्रदेश ज्या भाषिक राज्यांत येतो त्या भाषिक राज्यात तेथील वन्य जमाती व प्रदेश घालण्यात आला आहे. त्याला काही अपवाद आहेत ते पुढे पाहू.