पान:आमची संस्कृती.pdf/43

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

३६ / आमची संस्कृती

सुशिक्षित व पुढारलेल्या लोकांनी केले. मायभाषेपेक्षा उर्दूच भाषा जास्त चांगली येते, ही प्रौढी जसे मुसलमानी राज्यकर्त्यांच्या सहवासातील कित्येक लोक मारीत, तशीच प्रौढी आम्हांला स्वभाषेपेक्षा इंग्रजीच छान बोलता येते' म्हणून नवशिक्षित मारू लागले. स्वत:चा पोशाख व रीतीरिवाज टाकून मुसलमानांचे अनुकरण झाले तसेच अनुकरण इंग्रजी पोशाख रीतीरिवाज यांच्या बाबतीत झाले. स्वत:च्या धर्माची, पोशाखाची, तसेच दैवतस्वरूपाची चेष्टा हे सुधारकत्वाचे पुढारलेपणाचे लक्षण झाले. कोठच्याही देशाचे रितिरिवाज, धार्मिक समजुती व पोशाख ही तर्काच्या कसोटीला कधीही उतरणे शक्य नाही हे तत्त्व न उमजल्यामुळे आगरकरांसारखे लोक आपल्या रीतिरिवाजांवर हास्यास्पद टीका करीत, व त्या टीकेचे निराकरण, तितक्याच हास्यास्पद रितीने सनातनी करीत. ही प्रथमारंभीची आत्मनिंदा व दैन्य लवकरच उदयास आलेल्या राष्ट्रीय भावनेने नाहीसे झाले, पण आत्मगौरव व इंग्रजनिंदेचे एक नवीन तंत्र सुरू झाले. स्वत:च्या लघुत्वाच्या जाणिवेचा आविष्कार मनुष्य दोन तऱ्हांनी करतो- एक आत्यंतिक दैन्य दाखवून व दुसरे आत्यंतिक प्रौढी मारून. राष्ट्रीय लढ्याच्या युगातील दैन्यदर्शन हे या दुसऱ्या प्रकारचे होते. मात्र आमचे वाङमय किती उच्च दर्जाचे होते हे दाखविताना कालिदासाच्या शाकुंतलाबद्दल गटे काय म्हणाला हे सांगावयास या नव्या पिढीतील विद्वान कधीही विसरत नसत!
 समाजाचे जीवन सुसूत्र होण्यास सर्व समाज साधारणपणे मान देतो अशी परस्परसंबंधांची बांधणी पाहिजे. समाजव्यवहाराशी विधिनिषेधाचे नियमन पाहिजे. विधीसाठी चोदना व निषेध व्यवहारात उतरविण्यासाठी निबंधात्मक सत्ता पाहिजे, व ही चोदना आणि निर्बंध केवळ पिनल कोडावर अवलंबून न राहता दृढमूल झालेल्या सामाजिक मूल्यांवर अधिष्ठित पाहिजे. समाजाचे ध्येय, समाजातील नैतिक मूल्ये, धर्म व तत्त्वज्ञान या संस्कृतीवरच राष्ट्र उभे राहणे व भरभराटणे शक्य आहे. आज आमचे जीवन केवळ अनुकरणात्मक आहे. व्यक्तींनी काय करावे ते सुचत नसल्यामुळे निरनिराळ्या अर्वाचीन ऋषींचे आश्रम रामेश्वरापासून हिमालयापर्यंत या अगतिक जीवांनी भरलेले आहेत. सामाजिक ध्येये आखली नसल्यामुळे इंग्रजांच्याकडून घेतलेल्या शब्दांच्या पोकळ