पान:आमची संस्कृती.pdf/42

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ३५

वाचनीय असे आहे. इंग्रज जसे स्वतंत्र वाङमयाचे निर्माते आहेत, तसेच परकीयांच्या वाङमयाचे संकलक व भाषांतरकारही आहेत. इंग्रजी भाषेतून सबंध जगाच्या वाङमयाची ओळख करून घेता येते. भारतीय, मधला काही कालखंड वगळला तर, मुख्यत्वे बुद्धिप्रधान असल्यामुळे या नवीन ज्ञानामृतावर आधाशासारखे तुटून पडणार हे ठरलेलेच होते. यासारखे आपण काहीतरी करावे असे त्यांना वाटू लागले, व पाश्चिमात्यांच्या धर्तीवर शिक्षणक्रम येथे सुरू झाले. या नवशिक्षित पिढींतून नवे शास्त्रज्ञ, नवे कलाकार व नवे वाङ्मयनिर्माते पुढे आले. अगदी बोटावर मोजण्यासारखे असामान्य लोक वगळल्यास, ह्या क्षेत्रातील अपिली बहुतेक कामगिरी केवळ अनुकरणात्मक आहे. आम्ही नुसते परपुष्टच नव्हे, तर परागतिक' आहोत; इंग्रजांच्या समाजजीवनात वैचारिक लाटा उसळून जे राजकीय पंथ, शास्त्रीय दृष्टिकोन व वाङमयीन पद्धती उत्पन्न होतात किंवा इतर राष्ट्रांत उसळलेल्या लाटांचे जे वर्णन इंग्रजीच्याद्वारे आम्हांला कळते त्याची पुसट, फिक्या रंगांतील किंवा विकृत भडक रंगांतील प्रतिकृती आम्ही आमच्या सांस्कृतिक जीवनात उठवण्याचा प्रयत्न करतो. कोठल्याही सांस्कृतिक निर्मितीचा पाया स्वानुभूती हा आहे. शास्त्रीय कोडे स्वत:ला पडले पाहिजे, त्याची तळमळ स्वत: अनुभवली पाहिजे, तरच कलेची निर्मिती होऊ शकते. व्यक्ती व समाज यांच्या संबंधांची गुंतागुंत स्वत:च्या जीवनात प्रतीत झाली तर वाङमयनिर्मिती होते, नाहीतर स्वानुभूतीच्या पायाशिवाय 'कर्णिकार सुमनांचे' भरताड काय करायचे? आमची बहुतेक निर्मिती सहानुभूतीतून निघालेली आहे. इंग्रजांनी स्वातंत्र्ययुद्धाबद्दल लिहिले, आम्ही लिहितो; त्यांनी लघुकथा लिहिल्या, आम्ही अनुकरण करतो. त्यांनी कामकरी वर्गाची गाऱ्हाणी गायिली, आम्ही गातो;- त्यांत आत्मप्रत्यय व स्वानुभूती नसल्यामुळे हे। सर्व वाङमय, शास्त्र व बरीचशी कला कशी निर्जीव वाटते.
 सत्ताधाऱ्यांबद्दल द्वेष, मत्सर वाटला तरी त्यांचे अनुकरण जितांकडून प्रत्यही होत असते. स्वत:च्या अज्ञानाची, रीतीभातींची, आचारांची व धर्माची लाज वाटणे व शक्य ते करून बोलण्याचालण्यात व पोशाखात आपण त्यांपासून भिन्न नाही हे भासविण्याचा प्रयत्न होणे हे पराजित मनोवृत्तीचे निदर्शन आहे, व असले निदर्शन भारतातील सर्व प्रांतांतून