पान:आमची संस्कृती.pdf/44

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ३७


चौकटीत निरनिराळ्या राजकीय व सामाजिक चळवळींच्या कसरती चाललेल्या आहेत. dynamic and the static (गतिमान, स्थितिमान) forward progressive, backward, stagnant (पुरोगामी- बुसरलेले, सनातनी) democracy-dictatorship (लोकशाही, हुकूमशाही), creative, destructive (विधायक-विनाशक), अशी ही केवढी तरी लांबलचक शब्दांची मालिका देता येईल. या शब्दांच्या खुराकावर आपण जगणे शक्य नाही. हिंदी संस्कृतीच्या नावाखाली भारत नाट्य व नृत्य, जुनी शिल्पकला, जुन्या तऱ्हेची दागदागिन्यांची घडण, जुने विणकर व कारागीर यांना थोडाबहुत पैसा आज मिळत आहे; पण हा मान म्हणजे क्षणभंगुर फॅशनची लहर वाटते. नाट्य, नृत्य, शिल्प ही सर्व एकेकाळी चैतन्याने स्फुरणऱ्या पण पुष्कळ वर्षांपासून मरू घातलेल्या एका उज्ज्वल संस्कृतीचे अश्मीभूत अवशेष आहेत. जोपर्यंत ती परंपरागत संस्कृती परत नव्या जोमाने, नव्या शरीराने उठणार नाही, तोपर्यंत संस्कृतीची बाह्य चिन्हे केवळ सांगाडेच राहणार. ही सौंदर्याची प्रतीके बहुजनांच्या हृदयांत खेळत असलेल्या संस्कृतीचे मूर्तिमंत शरीर न राहता, श्रीमंतांची खेळणी राहतील. आमची सांस्कृतिक मूल्ये कोठच्याच बाबतीत ठरलेली नाहीत. आमच्या परंपरागत संस्कृतीच्या प्रत्येक अंगाचा आम्ही धिक्कार करतो. तथापि ती संस्कृती तीन हजार वर्षे सारखी बदलती पण अखंड राहिली आहे, तिला नव्या स्वरूपात आणता येईल. पूर्वीची मूल्ये परत नव्याने पारखून घेतो येतील, हे आम्ही विसरलो आहो. इंग्रज गेल्यानंतर अजून आम्ही स्वतंत्र संसार करू लागलो नाही. जर सांस्कृतिक मूल्ये ठरवली नाहीत तर नावाने स्वतंत्र राहून कोठल्या तरी पाश्चिमात्य राष्ट्राचे उपग्रह म्हणून आपल्याला कायम राहावे लागेल.
 आमच्या भ्रमिष्ट परिस्थितीचे दर्शन मिळण्यास लांब जाणे नको. समाज व राष्ट्र यांच्या जीवनास आवश्यक असलेल्या कितीतरी लहानमोठ्या प्रश्नांवर आज एक तर आम्ही मुग्धता तरी स्वीकारतो किंवा आज बोललेले उद्या विसरतो हे पुढील उदाहरणांवरून दिसून येईल. आमचे राष्ट्रगीत काय असावे? आमची राष्ट्रभाषा काय असावी? राष्ट्रातील प्रांत भाषावार असावेत की नसावेत? शिक्षण कोणत्या धर्तीवर असावे? भांडवलवाल्यांवर निर्बध घालावेत की नाहीत? हिंदुस्थानात लोकसंख्येचे