पान:आमची संस्कृती.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
आमची संस्कृती / १९

उत्क्रांत होत गेलेल्या बहुविध समाजसंस्थांचे अस्तित्व व त्यांची प्रदेशपरत्वे झालेली वाटणी यांच्या कारणांचा उमज पाडण्यास या ठळक विशेषांचे साहाय्य होणार आहे.
 हिंदूंच्या सांस्कृतिक इतिहासाची तीन प्रमुख वैशिष्ट्ये दिसून येतात. ती म्हणजे १. अखंड परंपरा, २. राजकीय व धार्मिक सत्तेच्या केंद्रीकरणाचा अभाव, ३. संस्कृतिसंघर्ष टाळून संस्कृतिसंगम करण्याची प्र्वॄत्ती.

 अखंडित परंपरा
 युरोपातील इंग्लंडपासून हिंदुस्थानांतील कृष्णाकाठपर्यंतचा एक सलग देशविभाग लक्षात आणला तर त्यांत बोलल्या जणांच्या भाषांना इंडो कॅमनिक भाषा असे म्हणतात. या सर्व भाषांपैकी हिंदुस्थानातील भाषातच काय ते जुन्यांत जुने ग्रंथ केवळ तोंडपाठ करून व स्मृतीच्या साहाय्याने एका कानामात्रेचाही फरक होऊ न देता कायम ठेवण्याचा अट्टाहास हिंदुस्थानात झालेला दिसतो. चार हजार वर्षांपूर्वी प्रार्थना ज्या म्हटल्या जात त्या आजही जशाच्या तशा शब्द न शब्द म्हटल्या जातात जुन्या ग्रंथातील संवादकविता, वर्णने आजही कायम आहेत. पुढे प्रगत झालेल्या नाट्यकलेची बीजे त्यांत सापडतात. त्यांत वर्णिलेल्या देवतांचे देवातात्व आजही मानले जाते. त्या प्राचीन काळच्या कोणत्याही गोष्टी आज हिंदुस्थानात पूर्णतया नष्ट झालेल्या नाहीत. देशाच्या या ना त्या भागात त्या जशाच्या तशा आढळतात. पुराणवस्तुसंशोधकांना उत्खनन करताना ज्या प्रकारची प्राचीन मातीची भांडी सापडलेली आहेत त्या प्रकारची मातीची भांडी आज देशात कोठे ना कोठे प्रत्यक्ष वापरात आहेत. प्राचीन शिल्पांतून किंवा चित्रकलेतून ज्या प्रकारच्या पोषाखांच्या तऱ्हा चित्रित केलेल्या आढळतात तशा प्रकारचे पोषाख आजही कोठे ना कोठे वापरात असलेले आढळतात.
 सूर्य ही देवता प्राचीन काळापासून आज-तागायत भजली जात आहे, तर यज्ञसंस्थाही अशीच अखंडित चालत आलेली आहे. अथर्ववेदांत सांगितलेले जादूटोणा, तोडगा, औषधी इत्यादिकांचे ज्ञान आजही शेकडा ऐंशी लोकांच्या वापरात आहे.