पान:आमची संस्कृती.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१६ / आमची संस्कृती

अशा लोकांना फक्त एकाच तर्‍हेचा, म्हणजे आपल्याला हवा असलेला बदल तेवढाच इष्ट असतो. त्यांच्या मनातूनही नाफेरवाल्यांप्रमाणे एकाच प्रकारची समाजरचना हवी असते. अशा सुधारकांना सर्वांनी अमुक एका प्रकारेच वागावे असे वाटते व कायदे, वर्तमानपत्रे व रेडिओ ह्यांच्याद्वारा ते आपल्या एकछाप 'सुधारणांचा प्रसार व प्रचार करीत असतात. अशा वेळी व्यक्तीला संस्कृतीच्या कायम ठशातून थोडेसे का होईना, पण बाहेर पडण्याची जी स्वतंत्रता असते ती नष्ट होते. सुधारणांच्या नावाखाली व्यक्तीचे आचारविचारांचे स्वातंत्र्य नष्ट झाल्यास संस्कृतीचे जीवन संपुष्टात येईल. संस्कृतीला खळखळत ठेवणाच्या व्यक्तिरूपी झऱ्याची स्वल्प का होईना, पण नवनवी जीवनाची देणगी नष्ट होऊन संस्कृती म्हणजे साचलेल्या पाण्याचे डबके होईल. म्हणून सुधारकांनी सुधारणेच्या नावाखाली पिंडा-पिंडांत असलेली भिन्न मती दडपून टाकून व्यक्तीला टांकसाळीतल्या नाण्यासारखा एक छाप देण्याचा प्रयत्न करू नये.
 संस्कृती ही समाजातील सर्व व्यक्तींनी बनवलेली असते, हे आपण पाहिले; म्हणून फक्त एका अंगाची सुधारणा करून टाकण्याचा हव्यास चुकीचा आहे. अस्पृश्यता नष्ट करावयाची तर, कायद्याने अस्पृश्यांना समता देऊन भागणार नाही. अस्पृश्यांचे सांपत्तिक व मानसिक दैन्य दूर करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत; पण त्याचबरोबर स्पृश्यांचे मनही शिक्षणाने नवसंस्कारित केले पाहिजे; त्यात मानवतेचे बीज रुजविले पाहिजे. सत्ताधाऱ्यांना वाटते की, कायद्याच्या जोरावर अल्पावधीतच काय हवे ते घडविता येईल. पण संस्कृती म्हणजे देह, इंद्रिये व बुद्धी ह्यांना लावलेले वळण- शिक्षण आहे हे लक्षात घेतले म्हणजे कळून येईल की, समाजसंस्था तर बदलल्या पाहिजेतच; पण त्याबरोबर शिक्षणाचीही तरतूद केली पाहिजे. शिक्षणाशिवाय नवी समाजरचना अल्पायुषी ठरेल. शिक्षणाचा परिणाम ताबडतोब दिसून येणार नाही; पण जेव्हा होईल तेव्हा दरगामी व टिकणारा असा होईल. जुन्या पिढीतील प्रागतिक पक्षाचे अग्रणी सांगत त्याप्रमाणे- 'Education, more education and yet more education.'- हा संस्कृति-परिवर्तनाचा एकमेव मंत्रं आहे. आणि तो एकमेव आहे. याचे कारण शिक्षणाने व्यक्तीचे आचार च विचारस्वातंत्र्य आकुंचित न होता वाढतच जाते.