पान:आमची संस्कृती.pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १५

बुद्धाच्या प्रेरणेने हे कमी झाले म्हणावे तर ब्रह्मदेश, चीन व जपान ह्या देशांतून शेकडो बौद्धधर्मानुयायी गायीचे मांस खातात. जैन धर्माच्या प्रेरणेने म्हणावे तर जैनांना सर्वच प्राण्यांचे मांस वर्ज्य आहे. एका काळी गायीला हिंदू पूज्य मानीत; पण तेव्हासुद्धा मृत जनावर खाणाऱ्या काही जाती हिंदू समाजात होत्याच. म्हणजे मांस खाण्यासाठी गाय किंवा बैल किंवा वासरू मारू नये- ती मेलेली असल्यास खाण्यास प्रत्यवाय नाही, असे दिसते. गायीचे दुभते म्हशीपेक्षा चांगले असते व बैल शेतीच्या अत्यंत उपयोगी आहे, ह्या दृष्टीने पाहिले तर, ज्या देशात गोमांस खातात तेथे गायीच्या दुभत्याची काळजी भारतापेक्षा जास्त घेतली जाते व तेथे बैलांची निपजही चांगली होते. गोमांस खाल्ल्याने ह्या दोन्ही गोष्टींना बाधा येण्याचे कारण नाही. एकच कारण राहते; ते म्हणजे सध्या काही लोकांना गाय इतकी पूज्य वाटते की, तिचे मांस खाण्याची कल्पनाही त्यांना सहन होत नाही! काही लोकांना काही गोष्टी आवडत नाहीत, तर त्यांच्या आवडीनिवडीला समाजाने कितपत मान तुकवावी असा प्रश्न उरतो. काही लोकांना मशिदीवरून वाद्ये वाजत गेलेली आवडत नाहीत; इतर देशांतून ती वाजवलेली चालतात. अशा वेळी एका वेळच्या जेतेपणाच्या रगीमुळे बसवलेला हा नियम समाजातील इतर लोकांनी पाळावा का? म्हणजे हे प्रश्न संस्कृतीचे नसून रोजच्या व्यावहारिक देवघेवीचे आहेत. इच्छा असली तर दोन्हींतूनही सर्वांना रुचेल अशी वाट काढणे शक्य आहे. पण सत्तेसाठी राजकीय प्रचारच करावयाचा असल्यास अर्थात तडजोड होणे शक्य नाही. मात्र ह्या सर्व भानगडीत बिचाऱ्या भारतीय संस्कृतीचा काडीमात्र संबंध नाही, हे विचारशील माणसाला पटण्यासारखे आहे.

 संस्कृतिपरिवर्तनाचा मंत्र
 संस्कृती बदलत जाते. म्हणजे बदल झाला की, संस्कृती बिघडली असे नव्हे. काही बदल चांगल्यासाठी होतात, काही वाईटासाठी होतात. म्हणून केवळ बदल झाला यासाठी ओरड करणे जसे योग्य होणार नाही, तसेच बदल झालाच पाहिजे यासाठी अट्टाहास करणेही योग्य होणार नाही. समाजसुधारक व राजकारणी पुरुष जाणूनबुजून समाजाला वळण लावण्याचा व सांस्कृतिक प्रवाह बदलण्याचा प्रयत्न करीत असतात. पण