आमची संस्कृती / १७
एखाद्या सामाजातील चांगल्या-वाईटाचे वाटेकरी सर्वच असतात व बदल करताना सर्वांनाच बदलावे लागते. वेश्यांचा प्रश्न हाती घेतला म्हणजे फक्त वेश्यांचीच सोडवणूक करून चालत नाही, तर त्यांच्यावर पोसणाऱ्या व त्याचा उपयोग करणाऱ्या सर्वांचीच सोडवणूक करण्याच्या मार्गाला लागले पाहिजे. अमका अपराधी व अमका बळी असा पंक्तिप्रपंच करून चालणार नाही. एका दृष्टीने सर्वच अपराधी असतात व सर्वच बळी असतात. संस्कृतीबाबतच्या कोणत्याही प्रश्नाचा विचार समष्टीने करावयास पाहिजे.
संस्कृतीमधील वाईट गोष्टींचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न करीत असताना व्यक्ती किंवा वर्ग ह्यांबद्दल द्वेष किंवा सूडभावना ठेवता कामा नये. वाईट समूळ नाश करावे, वाईटाचे पोषण करणाऱ्या वर्गाची तसे करण्याची शक्ती नाहीशी करावी; पण लक्षात ठेवावे की, सर्वच एका संस्कृतीचे बळी आहेत. समाजसुधारकांची वृत्ती न्यायनिष्ठर पण निर्वेर पाहिजे; नाहीतर सुधारणा न होता नवी वैरे, नवी शल्ये व नवे रोग मात्र निर्माण होतील! ज्ञानदेवांच्या अमृतवाणीने सांगायचे तर --
अज्ञान प्रमादादिकीं । कां प्राक्तनीही सदोखी ।
निंद्यत्वाच्या सर्वविखीं । खिळिले जे ।।
तया आंगीक आपुले । देउनिया भले ।
विसरविजती सबै । सलतीं तियें ।।
अशी समाजसुधारकाची व समाजसेवकाची वृत्ती पाहिजे.
- १९५५