बुद्धीच्या नेहमीच्या पद्धतीनुसार असा बदल करणे कसे वाईट आहे, जुन्या समाजसंस्था ईश्वरप्रणीत आहेत, त्या धर्म व नीतीला धरून आहेत वगैरे दाखविण्याचा प्रयत्न केला जातो.
निरनिराळ्या परिस्थितीत मानवाला जीवनासाठी जो झगडा करावा लागतो त्यांतून सामाजिक जीवनामुळे व भाषेच्या साहाय्याने मानवी संस्कृती निर्माण होत असते व निरनिराळ्या देशांत निरनिराळ्या काळी संस्कृती भिन्नभिन्न असते. प्रत्येक माणूस शिक्षणाच्या द्वारे संस्कृती दुसऱ्यास देत असतो व स्वत: ग्रहण करीत असतो. ह्या संक्रमण-ग्रहण क्रियेमुळे संस्कृतीत अव्याहत फरक पडत असतो. जितक्या व्यक्ती तितक्या संस्कृतींच्या प्रकृती असतात, ही गोष्ट भाषेच्या उदाहरणाने स्पष्ट होईल. एका घरची मुले त्याच मातापित्यांकडून भाषा शिकतात; पण प्रत्येकाचा उच्चार निरनिराळा असतो. काही वेळा काही प्रसंगाने काही शब्दांचे विशेष रूप होते व ते त्या कुटुंबात दृढ होते. लहान मूल वहिनीला नन्नी म्हणाले तर तेच नाव पुढे कायम होते. पण हे फरक व्यक्तिगत किंवा कौटुंबिक राहतात व काही सर्वमान्यही होतात. भाषा व्याकरणाने बांधली गेली तरी जोपर्यंत ती बोलभाषा राहते तोपर्यंत व्याकरणात न सांगितलेले कित्येक प्रयोग रोज होत असतात व हळूहळू भाषा इतकी बदलते की, दर शंभर वर्षांनी भाषेचे व्याकरण व शब्दकोश बदलत जातो.
जी परिस्थिती भाषेची तीच संस्कृतीच्या इतर अंगांची असते, हे अगदी पक्के लक्षात ठेवले पाहिजे. भारतीय संस्कृतीच्या नावाने प्रचार जेव्हा जेव्हा होतो, तेव्हा तेव्हा विचारवंताने मनाशी विचार करावयास पाहिजे की, भारतीय संस्कृती काय बरे आहे? प्रचारकाला संस्कृतीच्या कोणत्या अंगाबद्दल बोलावयाचे आहे? कोणत्या संस्कृतीला उद्देशून प्रचार चालला आहे? की संस्कृती ह्या गोड शब्दाच्या बुरख्याखाली राजकीय सत्तेसाठी प्रचार चालला आहे? केवळ अमकी गोष्ट जुनी म्हणून उत्तमही ठरत नाही वा टाकाऊही ठरत नाही. भारतीय संस्कृती भारतीयांच्या गरजेप्रमाणे बदलणार व तशी बदलल्यामुळे तिचे भारतीयत्व नष्ट होणार नाही.
गोवधंबदीचाच प्रचार उदाहरणादाखल घेऊ या. वेदकाली मोठे तपस्वी ब्राह्मण व ऋषिमुनी गायीच्या कोवळ्या वासरांचे मांस खात असत.
पान:आमची संस्कृती.pdf/21
Appearance
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१४ / आमची संस्कृती