पान:आमची संस्कृती.pdf/18

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.आमची संस्कृती / ११

रीतिभातींसंबंधी विचार करून त्यावर कथा रचावयाच्या व त्या चालिरीतींचे कर्तृत्व देवदेवता, मोठमोठे जुने राजे व ऋषि ह्यांच्या माथी मारून द्यावयाचे, हा एक त्यांचा आवडता उद्योग आहे. असे केले म्हणजे त्या चालिरीतींचा दबदबा वाढतो व मनुष्य त्याला मान तुकवितो. पहिल्याने भाषा की पहिल्याने व्याकरण? ह्या प्रश्नाला सर्व उत्तर देतील की, पहिल्याने भाषा म्हणून. तसेच आचारविचार हे पहिल्याने ढ होतात, मग कोणीतरी त्यांचे संकलन करतो व मग त्यांचे कायद्यांत रूपांतर होते व त्यांचे कर्तृत्व देव, ऋषि, मुनी किंवा राजे ह्यांकडे जाते. खरोखरी राजे किंवा ऋषिमुनी कायदे व विधिनिषेध निर्माण करीत नाहीत, समाजसंस्थाही निर्माण करीत नाहीत, समाजसंस्था निर्माण होत असतात; त्यांच्या निर्मितीला अनेक पिढ्यांतील अनेक व्यक्तींचे थोडेथोडे कर्तृत्व उपयोगी पडते; पण त्या व्यक्ती ही निर्मिती, जतन किंवा वाढ जाणूनबुजून करीत नाहीत. ती व्यक्तीच्या कृतीने होत असते. आपल्याला वाटते, आपण जाणूनबुजून कृती करीत असतो; पण पुष्कळदा कृती अजाणतेपणी होते व मग तिचे समर्थन करावयास बुद्धी कारणे पुढे करते. बुद्धी पुष्कळदा कृतीची कर्ती नसून कुशल टीकाकाराचे काम करते, कृतीला संपादून घेते. ह्या क्रियेमुळे प्रत्येक गोष्टीचे मूळ शोधण्यात बुद्धी खर्च होते व मग कथा, पुराणे व इतिहास निर्माण होऊ लागतात.
 भाषा कोणी उत्पन्न केली, हा प्रश्न हास्यास्पद वाटतो. पण संस्कृतीच्या इतर अंगांची निर्मिती कोणी एकाने केली असेल असे वाटणेही हास्यास्पद आहे. विवाहसंस्था कोणी निर्माण केली? नीतिनियम कोणी घातले? भारतात असंख्य जाती कोणी बनविल्या? हेही प्रश्न असेच हास्यास्पद आहेत. विवाहसंस्था निर्माण होऊन कित्येक पिढ्या लोटल्यावर श्वेतकेतूची गोष्ट सांगण्यात आली. यज्ञसंस्था घट्ट मूळ धरून राहिल्यावर अर्थवाद निर्माण झाला. भारतात असंख्य जाती पिढ्यानपिढ्या राहिल्या, त्यांचे परस्पर व्यवहारांचे संबंध रूढीने दृढ झाले व मग कधीतरी मनूने हामुराबीप्रमाणे सर्व व्यवहार एकत्र आणून त्यांची जंत्री केली.

 ह्याची जबाबदारी कुणावर?
 समाजातील चांगल्या गोष्टीची जी अवस्था, तीच वाईट गोष्टींची.