भाषेचे नियम माहीत नसतात. कित्येक व्यक्तीच्या बोलण्याच्या लकबींनी भाषा बनवली; पण कित्येक वैयक्तिक लकबी लोकमान्यता न मिळाल्यामुळे नष्ट झाल्या असणार. ही नवी भाषा संतकवींमुळे एक साधारण रूप पावून एका मोठ्या प्रांताची अधिकृत भाषा बनली. ह्या सांस्कृतिक क्रियेत व्यक्तीचा वाटा कोणता? समाजाचा कोणता? व्यक्तीच्या क्रियेला ज्या वेळी सामाजिक संमतीचे शिक्कामोर्तब होते, तेव्हा ती संस्कृतीच्या ओघात मिळते व मिळता-मिळता त्या ओघाला वळण लावते. ह्या संस्कृतीच्या असंख्य निर्मात्यांची नावनिशी क्वचितच असते. ते सर्वच उपेक्षिलेले असतात. संस्कृतीतील चांगल्या गोष्टींबद्दल कोणी त्यांचे अभिनंदन करू शकणार नाही किंवा वाईट गोष्टींबद्दल त्यांचा निषेधही करणे शक्य नाही. एकएका व्यक्तीचा भाग क्षुद्र असतो, पण बहुतेक वेळा सांस्कृतिक निर्मिती अभावितपणे होत असते व बहुतेक प्रसंगी व्यक्तीच संस्कृतीच्या आहारी गेलेली असते.
कर्तृत्व ईश्वराकडे का?
सर्व जगभर संस्कृती निर्मितीच्या कथा पसरलेल्या आहेत. अमक्या मूळ पुरुषाने अमकी खाद्य वस्तू शोधून काढली, अमक्याने शेतीची सुरुवात केली अशा तऱ्हेच्या त्या कथा असतात. त्यांच्यात ऐतिहासिक सत्य फार थोडे असते. गुंतागुंतीचे सामाजिक व्यवहार व नियम हे भाषेप्रमाणेच एका व्यक्तीने निर्माण केलेले कधीही नसतात. बाबिलोनियाचा राजा हामुराबी याने पहिले कायदे केले असे म्हणत. आता शोधाअंती असे आढळून आले आहे की, तसले कायदे त्याच्या आधी जवळच्या प्रदेशात लागू होते. लहान लहान राज्ये जिंकून मोठ्या प्रदेशाचा राजा झाल्यावर हामराबीने सर्व कायदे एकत्र करून त्यांची सर्व राज्याला लागू पडेल अशी एक जंत्री ऊर्फ संग्रह तयार केला व तो सूर्यदेवाने दिला अशी द्वाही फिरविली. सूर्यदेवाने कायद्यांचा कागद हामुराबीच्या हातात ठेवला अशा तऱ्हेचे कोरलेले चित्र व खाली कोरलेले कायदे असे स्तंभ सापडले आहेत.
प्रत्येक राजा आपले शासन ईश्वरप्रणीत आहे हे सांगण्याचा अट्टाहास करतो! मनुष्य विचारशील आहे; त्याला माहीत असलेल्या