Jump to content

पान:आमची संस्कृती.pdf/19

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १३

की, व्यक्ती विशिष्ट संस्कृतीत जन्मते, त्या वातावरणात वाढते व बुद्धीची वाढ व्हावयाच्या आतच त्या संस्कृतीची मूल्ये आत्मसात करते. ह्या मूल्यांविरुद्ध बऱ्याच व्यक्ती जेव्हा बंड पुकारतात तेव्हा ती बदलतात. पण बंड पुकारणाऱ्या व्यक्तींना काही वेळा यश मिळते; काही वेळा मिळत नाही.
 संस्कृतीत बदल व्हावयास त्या संस्कृतीत जन्मलेल्या व्यक्तींचे गुण व वर्तन जसे कारणीभूत होते, तसेच इतर संस्कृतींशी संबंध आला म्हणजेही परिवर्तनास मदत होते. मानवांच्या समतेबद्दल भारतात बुद्धापासून वैष्णवांपर्यंत निरनिराळ्या व्यक्तींनी व पंथांनी चळवळ केली; पण त्या चळवळीचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही. मानवी समतेची बुद्धाची कल्पना व वैष्णवांची कल्पना मोक्षमार्गाबद्दल होती - सामाजिक व्यवहार, विशेषत: बेटीव्यवहाराबद्दल नव्हती. पाश्चिमात्यांचे एकछत्री राज्य, मिशनऱ्यांची धर्मपरिवर्तनाची चळवळ, स्वातंत्र्ययुद्धाच्या लढाईत पुढा-यांना एकोप्याच्या आवश्यकतेची झालेली जाणीव, 'समता ही एकोपा साधण्याची गुरुकिल्ली होय' ह्या तत्त्वाचे ज्ञान व पाश्चिमात्यांच्या लोकसत्तेच्या कल्पना, ह्यामुळे जातिभेद व अस्पृश्यता ह्या प्रश्नांना चालना मिळाली. ह्या बाबतींतही व्यक्ती प्रभावी की संस्कृती प्रभावी हा प्रश्न विचारल्यास संस्कृती-संस्कृतींच्या संगमाचा प्रभाव जास्त, असेच म्हणावे लागेल. मोठमोठ्या व्यक्तींनी ह्या प्रश्नाला हात घातला, जागृती केली हे खरे; पण त्या व्यक्ती कालकर्त्या होत्या की कालप्रातिनिधिक होत्या, हा प्रश्न परत उरतोच.

 बदल चालू राहणारच!
 संस्कृतीच्या अंगोपांगांची निर्मिती व्यक्तीद्वारे होत असते; पण व्यक्तीला त्याचे कर्तृत्व देता यावयाचे नाही. तरीपण व्यक्ती व वर्ग संस्कृतीच्या निरनिराळ्या अंगांचा भरपूर फायदा घेऊ शकतात व घेतात. ब्राह्मण व वरच्या वर्गाने जातिसंस्थेचा फायदा घेतला हे नि:संशय; पुरुषवर्गाने पितृप्रधान कुटुंबपद्धतीचा फायदा घेतला हेही तितकेच खरे. ज्या समाजव्यवस्थेत एखाद्या वर्गाचा किंवा व्यक्तींचा फायदा होत असतो. तिच्यात बदल करण्यास तो वर्ग व ती व्यक्ती तयार नसते; आणि मानवी