पान:आमची संस्कृती.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

आमची संस्कृती / ९

माहीत आहे. व्यक्ती ज्या संस्कृतीत वाढली ती संस्कृती ती उचलते. संस्कृती हीच व्यक्तीच्या, देह व बुद्धीच्या धर्माचा कर्ताकरविता परमेश्वर आहे, असे म्हणणे बरोबर होईल का? संस्कृती हा एक प्रचंड ओघ आहे व व्यक्ती हा त्या ओघांतील एक प्रवाहपतित जीव आहे. अशा तऱ्हेने व्यक्तीच्या व संस्कृतीच्या अन्योन्य संबंधाचे वर्णन करता येईल का?

 संस्कृतीचा निर्माता कोण?
 हे वर्णन एका बाजूने बरोबर असले तरी दुसऱ्या दृष्टीने खरे नाही. संस्कृतीचा निर्माता कोण? संस्कृती साकारते कशात? संस्कृतीत बदल कोण घडवून आणते? अश्म युगातील ओबडधोबड हत्यारे कोणातरी व्यक्तींनीच घडवली असणार; प्रत्येक निर्मिती व्यक्तीकरवीच झाली असणार. पोषाख, खाणे-पिणे, आचार-विचार ह्यांत बदल व्यक्तीच करीत असते. समाज म्हणजे मोठे थोरले हात-पाय व डोके असलेला व सांस्कृतिक क्रिया करणारा कोणी विराट पुरुष नव्हे. कोणत्याही समाजाची संस्कृती काय आहे हे ठरवायचे झाल्यास त्यातील व्यक्तींच्या जीवनक्रमाचे सूक्ष्म परीक्षण करावे लागते व बऱ्याच व्यक्तींना साधारण असे आचारविचारांचे रूप करून त्याला संस्कृती हे नाव द्यावे लागते. दुसऱ्या दृष्टीने व्यक्तीच्या जीवनात संस्कृती ही दैवासारखी म्हणावी लागते. दुसऱ्या दृष्टीने संस्कृतीचा कर्ता, संस्कृती धारण करणारा, तिला थोडथोडी बदलणारा एक-एक माणूस किंवा व्यक्तीच असते हे विसरून चालणार नाही. व्यक्ती ज्या संस्कृतीत जन्माला येईल त्याप्रमाणे तिचा जीवनक्रम ठरेल, हे बऱ्याच अंशी खरे असले तरी व्यक्तीला स्वत:चा जीवनक्रम घडविण्याचीही स्वतंत्रता आहे व तसे करीत असताना सामाजिक संस्कृती बदलण्याचीही शक्ती थोडीफार आहे.
 तरीसुद्धा व्यक्ती संस्कृती निर्माण करते ह्याचा अर्थ काय? एकच उदाहरण घेऊ. ख्रिस्त शकाच्या आठव्या ते दहाव्या शतकात मराठीचा प्रसार झाला. 'महाराष्ट्री' ह्या प्राकृत भाषेपासून मराठी कोणी बनविली? भाषा प्रगल्भ झाली म्हणजे तिच्यावर व्याकरण लिहून तिच्यातील शब्दोच्चारांचे- महाराष्ट्रीतून मराठीत येताना होणाऱ्या फरकांचे नियम बांधता येतात; पण भाषा बनते तेव्हा बोलणा-या व्यक्तींना नव्या होणा-या