पान:आमची संस्कृती.pdf/132

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / १२५

उपप्रकारांपैकी एक होती. काही लोक तिच्यात पर्शियन व अरबी शब्दांची खैरात करून वापरू लागले तर काही शुद्ध देशी शब्द वापरीत. पर्शियन व अरबी शब्दांचा भरणा खूप झाल्याने त्या भाषेची लिपीही अरबी बनली व मुसलमानी राजवटीत दरबारी भाषा पर्शियन व शिपायांची भाषा ऊर्दू असे झाले व बहुतेक मुसलमानांनी ती उचलली. तरी प्रत्येक प्रांतांतील खेडेगावातील मुसलमानांना ऊर्दूही येत नसे व पर्शियनही येत नसे. ते त्या त्या प्रांतांतीलच भाषा बोलत. ऊर्दू ही कोणत्याही प्रांताची भाषा नव्हती. पण काही सामाजिक थरांतून सर्व हिंदुस्थानभर तिचा प्रसार झाला. पुढे इंग्रजांनी हीच भाषा आपल्या लष्करांत शिकविल्यामुळे इंग्रजी राजवटीत तिच्या प्रसाराला अधिकच वाव मिळाला.

 इंग्रजीचे दूरगामी परिणाम
 इंग्रज १५ व्या शतकापासून हिंदुस्थानात आले. त्यांचे एकछत्री राज्य भारतात दोनशे वर्षेच टिकले. हे राज्य जरी २०० वर्षेच टिकले, तरी त्याचे भारतावर झालेले परिणाम फारच दूरगामी स्वरूपाचे आहेत. इंग्रजांच्या आधी संबंध भारतावर एकछत्री राज्य कुठच्याही काळात नव्हते. एक शासनव्यवस्था कुठच्याही काळात नव्हती.
 इंग्रजांच्या राज्यातही नव्या धर्माचा प्रचार व प्रसार खूप झाला, पण भारतावर मुख्य परिणाम नव्या धर्माचा न होता, नव्या यंत्रयुगीन उत्पादनाचा, समाजव्यवस्थेबाबतच्या व राज्ययंत्राबाबतच्या तत्त्वप्रणालीचा झाला. प्रजासत्ताक राज्य, प्रत्येक स्त्री-पुरुषाला मतदानाचा हक्क, जातिविरहित समाजव्यवस्था, सर्वांना एक कायदा ह्या भारताच्या घटनेतील मूलभूत गोष्टी इंग्रजांच्यामुळे आपल्यात आल्या आहेत व त्या गोष्टींचा अभिमान जागृत होण्यास मुख्यत्वे इंग्लिश वाङमयच कारणीभूत झाले.
 इंग्रजी राज्यकर्ते बरोबर इंग्लिश भाषा घेऊन आले व मेकॉलेच्या तत्त्वामुळे ती भाषा भारतीय शिक्षणपद्धतीत शिरली. इंग्रजी वाङमय जगातील पुढारलेल्या व संपन्न वाङमयापैकी आहे. त्यातील धार्मिक मतप्रणालीमुळे नव्हे, तर सामाजिक व राजकीय प्रतिपादनामुळे त्या वाङमयाने भारतीयांना जीवनाचे एक नवीनच दालन खुले झाल्यासारखे