पान:आमची संस्कृती.pdf/122

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती /११५

विवाहबाह्य पण कायम संबंध एखाद्या बाईशी जोडतो, त्यावेळी त्या बाईपासून होणाच्या संततीच्या पालनपोषणाची जबाबदारी त्याच्यावर असते व त्याच्यामागे त्याच्या वारसांत कोठे तरी ह्या मुलांची तरतूद झाली पाहिजे. रक्षा म्हणजे एका पुरुषाचे घर धरून त्याच्याशी एकनिष्ठपणे राहिलेली स्त्री. ही स्त्री त्या पुरुषाच्या आयुष्यभर त्याच्याजवळ असते व तिची व तिच्या संततीची तरतूद कायद्याने होणे रास्त आहे. तसेच रक्षेला इस्टेटीत भाग दिला नाही तरी तिच्या व तिच्या अज्ञान मुलांच्या पोषणाइतकी व्यवस्था इस्टेटीतून होणे जरूर आहे. वेश्या ही धंदेवाईक व अनेक पुरुषांशी संबंध ठेवून त्याबद्दल मोबदला घेणारी बाई असते. तिचा संबंध मर्यादित स्वरूपाचा असतो व म्हणून तिच्याबद्दल कोणाही एका पुरुषावरच जबाबदारी पडत नाही. पण रक्षा एका पुरुषाची बांधलेली असते. त्या पुरुषाखेरीज तिला व तिच्या संततीला पोषणकर्ता दुसरा नसतो व म्हणून तिच्या व तिच्या संततीच्या पोषणाची जबाबदारी तिच्या मालकावर पडली पाहिजे. तसे न केल्यास रक्षा व रक्षेची पोरे ह्यांची जबाबदारी सबंध समाजावर पडेल व भोगणारा एक व निस्तरणारा दुसराच असा प्रकार होईल. ज्याप्रमाणे वारसांत मुलींना दुय्यम दर्जाचे स्थान दिले आहे, तसेच त्यापेक्षाही थोड्या कनिष्ठ दर्जाचे का होईना, पण दूरदूरच्या नातलगांपेक्षा जवळचे स्थान रक्षेच्या मुलांना देण्यास हवे.
 ह्यानंतर दत्तक प्रकारासंबंधी एक दोन मुद्दे सांगावयाचे आहेत. त्यासंबंधी सौ. राणी लक्ष्मीबाई राजवाडे ह्यांनी दत्तक घेण्याची परवानगीच मुळी कायद्यातून काढून टाकावी असे आपल्या साक्षीत सांगितले असे ऐकीवात आहे. कोणत्याही साक्षीचा धड वृत्तांत कोणत्याच वर्तमानपत्रात आला नसल्यामुळे लक्ष्मीबाईचे नक्की म्हणणे काय आहे हे समजत नाही. पण वरीलप्रमाणे त्यांचे मत असल्यास माझी त्याला पूर्ण सहमती आहे. पण हिंदी कुटुंबात ही रूढी इतकी दृढमूल झाली आहे व पिण्डदान स्वपुत्रहस्ते व्हावे अशी हजारो हिंदूची इतकी तीव्र मनीषा आहे की, ती इतक्या तडकाफडकी काढू नये असे मला वाटते. शिक्षण व प्रचार ह्या दोन गोष्टींचा अवलंब करून सुशिक्षितांनी दत्तक न घेण्याची प्रथा पाडून ही रूढी हळूहळू नष्ट करावी; त्यासाठी कायद्याची मदत घेऊ नये.
 ह्या दत्तक प्रकरणात कोणाही पुरुषाला, मग त्याचे लग्न झाले असो