पान:आमची संस्कृती.pdf/121

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

११४ / आमची संस्कृती

 एखादा हिंदू मनुष्य आपल्या इस्टेटीची व्यवस्था काय करावी हे लिहून न ठेवताच मेला तर त्याचे वारस कोण होतील याबद्दल कायदा करताना अगदी प्रथमच हिंदुस्थानातील काही विभागांना त्यातून वगळले आहे. चीफ कमिशनरच्या अंमलाखालील प्रांतांखेरीज इतर प्रांतांत शेतजमिनीबाबत हा कायदा लागू होणार नाही. साधारणपणे चीफ कमिशनरच्या अंमलाखालील मुलूख मागासलेले आहेत, त्यांना मात्र हा थोडाबहुत प्रगमनशील कायदा लागू होणार नाही व इतर मोठाल्या प्रांतांच्या बाबतीत मध्यवर्ती सरकार काहीही करू शकणार नाही. कोणत्याही प्रांताला स्वेच्छेने हा कायदा शेतजमिनीच्या इस्टेटीलाही लागू करता येईल हे खरे, पण तसे करण्याची सक्ती करण्याचे अधिकार मध्यवर्ती सरकारला नसल्याने शेतजमिनीबाबत हिंदुस्थानात प्रांताप्रांतांमधून निरनिराळे कायदे अस्तित्वात येतील व हल्ली नसलेले एक नवे वैचित्र्य प्रांताप्रांतांच्या रूढींत दिसून येईल.
 तदनंतर इस्टेटीचे वारस कोण, ह्या विवेचनात विधवा बायको, मुलगा, मुलगी, बाप नसलेला नातू अगर पणतू असे पहिले वारस घातले आहेत. ह्या यादीपैकी कोणी नसल्यास मुलीचा मुलगा, आई, बाप, भाऊ व पुतण्या हे घातले आहेत, व ह्यांच्यापैकीही कोणी नसल्यास मुलाची व मुलीची मुलगी वगैरे घातली आहेत. मेलेल्या मुलाच्या मुलाला जर प्रथम श्रेणीतील वारस गणतात तर मेलेल्या मुलीच्या मुलाला मुलीलाही तोच हक्क असावा असे वाटते. त्याचप्रमाणे प्रथम श्रेणीतील वारस नसल्यास मुलाची मुलगी व मुलीचा मुलगा-मुलगी यांना इस्टेट मिळावी हे रास्त दिसते. मयताचे भाऊ-पुतणे ह्यांपेक्षा मयताला स्वत:च्या मुलांची मुलेच जास्त निकटवर्ती वाटणार हे उघड आहे व हा सर्व कायदा स्वकष्टार्जित इस्टेटीबद्दल असल्यामुळे तर अशा त-हेने नातवंडांना (नातींना) वगळून इस्टेट दुसरीकडे जाण्यास मुभा देणे अन्यायाचे आहे. त्याचप्रमाणे निरनिराळ्या एकाखालच्या एक अशा वारसांच्या सहा श्रेणी दिल्या आहेत. त्यांमध्ये चुलते, चुलत चुलते, पुतणे, पुतण्यांचे मुलगे, चुलत पुतणे, मामाचा नातू, मामाचा मुलगा, मावशी, मावशीचा मुलगा, आत्याबाई, आजोबाची बहीण वगैरे लांबचे नातेवाईक दिले आहेत. पण कोठेही रक्षेच्या मुलाचे नाव नाही. हे न्याय्य नाही. एखादा मनुष्य जेव्हा रक्षा ठेवून