पान:आमची संस्कृती.pdf/106

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / ९९

निग्रो लोकांना निग्रोपणाची चीड येत नाही तर निग्रो म्हणून मिळणाच्या सामाजिक वागणुकीचा त्यांना संताप येतो. वरच्या जातींना ह्या चिडीची कल्पना यावयाची नाही. पण आपल्या सुदैवाने आपणावर अशी एक राष्ट्रीय आपत्ती कोसळली होती की, ह्या अन्यायाची थोडीशी चुणूक आपणा सर्वांना दिसली असेल. इंग्रजांच्या राजवटीत काही क्लबांवर, काही कंपन्यांच्या आवरात, हिंदी माणूस व कुत्रे यांना मज्जाव (Indians & dogs not allowed) अशा त-हेच्या पाट्या असत. आपल्या भूमीवर आपल्याला अशी वागणूक मिळावी म्हणून सर्व देशभक्तांचा संतापाने भडका उडे, पण अगदी अशीच वागणूक आपण आपल्या देशबांधवांना देतो हे त्यांच्या ध्यानी येत नसे व अजूनही येत नाही. मनुष्यगणनेत जातींची नावे गेली. कायद्याने सर्व जातींना समानता दिली, पण खेड्यापाड्यांतून, मंदिरे, विहिरी, आखाडे, चावडी ह्या ठिकाणी सर्वांना प्रवेश मिळतो का? ह्या सर्व ठिकाणी कुत्री व गाढवे जाऊ शकतात. पण काही जातींतील माणसांची तेथे जाण्याची छाती नाही. ही झाली सामाजिक प्रतिष्ठेच्या बाबतींतील विषमता. अगदी अशीच विषमता संपत्तीच्या बाबतींतही दिसते. पुण्यातील गोखले अर्थशास्त्र संशोधन संस्थेने गेल्या पंधरा वर्षांत महाराष्ट्रातील काही शहरे व बरीचशी खेडेगावे ह्यांची आर्थिक पाहणी केली. त्यात त्यांना दिसून आले की, सुस्थितीच्या बाबतीत श्रेष्ठ, कनिष्ठ अशी वर्गवारी केल्यास ब्राह्मण-मराठे-व महार असा क्रम लागतो. काही मराठा घराणी सधन असतील. काही महार काही मराठ्यांपेक्षा खाऊन पिऊन सुखी असतील. पण एकंदर सबंध जातीचा विचार केला तर, ब्राह्मण व तत्सम जाती मराठे व तत्सम जातींपेक्षा व मराठे आदि जाती अस्पृश्यांपेक्षा राहणीच्या मानात वरचढ आहेत. जेथे समाजाचे मोठाले घटक अशा विषम परिस्थितीत आहेत तेथे एकमेकांविषयी प्रेम व बंधुभाव नांदणे शक्य नाही.
 सामाजिक समता व विषमता हे शब्द आपण वारंवार उपयोगितो. पण त्याचा अर्थ व व्याप्ती काय हे पुष्कळदा समजत नाही. सामाजिक समता म्हणजे समाजातील प्रत्येकाचे उत्पन्न सारखेच असले पाहिजे असे नव्हे. कारण जरी राष्ट्रीय संपत्तीची अशी वाटणी केली तरी थोड्याच अवकाशात व्यक्तींच्या स्वभावानुसार व कष्टांनुसार त्यांत फरक होईल. ज्या समाजात