पान:आमची संस्कृती.pdf/105

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

९८ / आमची संस्कृती

ज्यांच्याकडे जाणार आहेत ते मराठे जातीयवादात बुडून राहिले तर इतर जमातींना पोटात भय वाटणार नाही का? काही जातींना वाटते की आपल्या बुद्धीच्या जोरावर आपण कायम वर्चस्व टिकवू, काहींना वाटते की, संख्याधिक्याच्या बळावर आपण इतरांना मारून काढू. पण हे दोन्ही मार्ग जातिदृष्ट्या व समाजदृष्ट्या विघातक आहेत. ह्याने जातीचेही कल्याण होणार नाही व समाजाचेही कल्याण होणार नाही. आजच्या तात्कालिक स्वार्थासाठी मात्र निरनिराळ्या जातींचे लोक एकत्र आलेले दिसतात. एखाद्या धाडसी दरोड्यांतील आरोपींची नावे वाचली तर ब्राह्मण, मराठे, महार, मुसलमान वगैरे निरनिराळ्या जातीचे लोक एकत्र दिसतात. तसेच निवडणुकीच्या धामधुमीत पक्ष उभे करताना तो सर्वमान्य आहे हे दाखवण्याच्या खटपटीत निरनिराळ्या जातींच्या लोकांची नावे दिसतात. पण दरोड्याच्या लुटीचे वाटे करण्याची वेळ आली किंवा इलेक्शन आटोपल्यावर मंत्री उपमंत्री नेमण्याची वेळ आली की, हा जातीवाद ऐक्याचा देखावा मृगजळाप्रमाणे विरून जातो व सहानुभूतिशून्य रखरखीत तापलेले, भडकलेले समाजजीवन मात्र खाली उरते. समाजातील घटक एकमेकांवर अवलंबून आहेत याचा अर्थ ज्या वेळी सर्व घटकांची ऊर्जितावस्था येईल, ज्या वेळी सर्व घटक सहकार्याने राहतील त्याचवेळी भरभराटलेले संस्कृतिसंपन्न समाजजीवन शक्य होईल, एरवी नाही.
 सामाजिक समता
 सर्व घटकांचे सहकार्य व बंधुभाव उत्पन्न होण्यास एका गोष्टीची आवश्यकता आहे- किंबहुना त्याशिवाय सहकार्य व बंधुभाव मुळी शक्यच नाही. ती गोष्ट म्हणजे सामाजिक समता. सामाजिक समतेच्या नावाखालीच जातिभेद नष्ट करण्याची चळवळ चाललेली आहे. जातिभेद नष्ट करणे म्हणजे दशवार्षिक होणा-या लोकसंख्येच्या गणनेतून जातींची नावेच गाळून टाकणे नव्हे, तर जातीजातींत दिसून येणारा, संपत्ती व सामाजिक प्रतिष्ठा ह्यांतील भेद नष्ट करणे होय. डॉ. आंबेडकरांना आपण महार आहो ह्याचा अभिमानच वाटत असला पाहिजे. त्यांची विद्वत्ता व यासंग ह्यांचे असामान्यत्व त्यांनी विषम परिस्थितीवर मिळविलेल्या विजयांत आहे व तो विजय महार या तीन अक्षरांनी न सांगता जाहीर होतो.