पान:आमची संस्कृती.pdf/104

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / ९७


निरक्षरांपुढे पडलेला अंधार दूर होत नाही, काही थोडे घरे बांधून, मोटारी ठेवून राहिले म्हणून ज्यांना घरदार नाही अशांची दैना कमी होत नाही. काही थोड्यांना भरपूर अन्न व कपडे मिळाले म्हणून अर्धपोटी उघड्या नागड्यांना ऊबही येत नाही व त्यांचे पोटही भरत नाही. जेव्हा बहुतेक सर्वांच्या प्राथमिक गरजा भागतील तेव्हा सर्व घटक मिळून एक बलशाली समाज निर्माण होईल, एरवी नाही. हे साध्य होण्यास एका घटकाची वेदना ती सर्व घटकांची, ही भावना असली पाहिजे. पायाच्या करंगळीला टोचले तर सर्व शरीराला वेदना झाल्या पाहिजेत. अगदी हीच प्राथमिक भावना आपणात नष्ट होत चालली आहे. जातिनिष्ठ समाजात एक एक जात, आपण एका विराट समाजाचा लहानसा अवयव आहो हे विसरून सबंध समाज जणू आपणातच सामावला आहे ह्या भावनेने वर्तन करीत असते. ब्रिटिशांच्या राजवटीत व सध्याच्या काळात जातिनिष्ठा पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. पूर्वी आपापल्या गावी सर्वांना सांभाळून वागावे लागे. जात किंवा गाव वाळीत टाकील तर जिणे अशक्यप्राय होत असे. ब्रिटिशांच्या राज्यात कुटुंबाला, जातीला व गावाला धाब्यावर बसविणे शक्य झाले. पूर्वी आपल्या गावांतील व भोवतालच्या पाच दहा गावांतीलच जातभाई माहीत असत. ब्रिटिशांच्या दळणवळणादी साधनांमुळे सातासमुद्राच्या पलीकडचे जातभाई ओळखीचे होऊ लागले व इतर जातीच्या शेजा-यांपेक्षा जवळचे वाटू लागले. ब्रिटिशांआधी कोकणस्थ चितपावन संघ, अखिल भारतीय धनगर समाज, मराठा शिक्षण मंडळ अशासारख्या केवळ विशिष्ट जातीच्या कल्याणासाठी काढलेल्या संस्था कोणत्या तरी राजवटीत होत्या काय? संस्थेचा उद्देश कल्याणप्रद असला तरी तीमुळे जातीय भावना बळावते व समाजाचे कल्याण तेच जातीचे कल्याण ही भावना नष्ट होण्याच्या मार्गावर लागते. दोनशे वर्षांपूर्वीपासून मद्रास इलाख्यात वस्ती करून राहिलेले, घरची बोली तामीळ झालेले चितपावन युवक पुण्याच्या चितपावन संघाकडून मदत मिळवून मद्रासला शिक्षण करतात ही गोष्ट काय सांगते? तुमच्या सातारच्या धनगरांचे कल्याण सातारा जिल्ह्याच्या समृद्धीवर अवलंबून आहे, की पंजाबच्या जातभाईंच्या संघटनेवर अवलंबून आहे? एके काळी महाराष्ट्राचे राज्यकर्ते असलेले व उद्याच्या भविष्यकाळात राज्यसूत्रे