पान:आमची संस्कृती.pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



आमची संस्कृती / ९३


 ब्राह्मणांच्या विद्येविषयी किंवा संस्कृतिरक्षणाच्या कामगिरीविषयी कोणाचे दुमत होणार नाही. पण त्यांचे समाजघटनाशास्त्र व समाजधारणाशास्त्र दोषरहित खासच नव्हते. ब्राह्मणांनी तयार केलेली घटना व शासनसंस्था आपल्या वर्गापुरतीच होती. इतर वर्गानी ब्राह्मणांच्या व्यवहारांत- अधिकारक्षेत्रात ढवळाढवळ केल्यास काय शासन असावे एवढ्यापुरता इतर वर्गाशी त्यांचा संबंध होता. क्षत्रिय हे शासनकर्ते असल्यामुळे काही काळ त्यांना मोठा दर्जा देऊन संभाळून घेण्याचे काम ब्राह्मणांनी केले; पण इतर सामान्य जनांसाठी त्यांनी काय केले? खालील जातींचा विवाहसुद्धा ते धार्मिक विधी म्हणून मानण्यास तयार नव्हते. त्यांनी शूद्र म्हटलेल्या लोकांत ज्या हजारो जाती होत्या त्यांतील व्यक्तींचे नियंत्रण त्या त्या जातींतील वृद्धांच्या पंचायतीकडून होई; त्या गोष्टी ब्राह्मणांपर्यंत येतच नसत. एवढेच नव्हे, तर ज्या जातिसंस्थेने हिंदू समाजधारणेचे मुख्य कार्य आजपर्यंत केले ती जातिसंस्थासुद्धा ब्राह्मणांनी उत्पन्न केली नाही, असे केतकरच सांगतात.
 केतकरांच्या मते परमतसहिष्णुता व परधर्मातील दैवतांचे आत्मीकरण हे। दोन हिंदु समाजाचे मोठे गुण आहेत. पण हीच वृत्ती बुद्ध, ख्रिस्त व महंमद ह्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वच सुसंस्कृत समाजांत दिसून येते. इजिप्त, असीरिया आणि नंतर ग्रीक व रोम या सर्वच ठिकाणी लोकांनी हिंदूंच्यासारखे तेहतीस कोटी देव जमविलेच होते; व परधर्मीय म्हणजे अमक्या एका दैवतावर विश्वास ठेवणारा म्हणून कोणाही मनुष्याचा छळ करण्याकडे ह्या जुन्या संस्कृतीची प्रवृत्ती नसे. छळ झाला तो फक्त ख्रिस्ती यहुदी लोकांचा आणि तो त्यांच्या स्वत:च्या आततायीपणामुळे व असहिष्णुतेमुळे. त्यांनी जर ‘आमचा देव तेवढाच खरा' असा हटवादीपणा केला नसता, तर त्यांच्या संप्रदायाला कोणी विचारले देखील नसते. ख्रिस्तपूर्व संस्कृतीत सर्वच धर्म सामाजिक व प्रादेशिक स्वरूपाचे होते; आणि त्यांना इतर कोणी प्रतिस्पर्धी नसल्यामुळे त्यांचे विधिनिषेध सर्वच मानवांना उद्देशून होते. हे वैशिष्ट्य फक्त हिंदू धर्मापुरतेच होते असे नाही, ही गोष्ट डॉ. केतकरांनी लक्षात घेतलेली दिसत नाही.
 ख्रिस्ती व महंमदी धर्माच्या आक्रमणामुळे हिंदू समाजाच्या दृढीकरणास वेळ मिळाला नाही, हेही केतकरांचे म्हणणे बरोबर नाही. चातुर्वर्ण्य व जातिसंस्था ह्यांच्या द्वारे निरनिराळ्या भारतीय समाजाचे एकीकरण झाले हे