पान:आमची संस्कृती.pdf/99

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
आमची संस्कृती / ९१


हिंदू समाजात परस्परांहून विभक्त अशा तीन हजारांहून अधिक जाती व त्याहीपेक्षा अधिक पोटजाती आहेत. हा प्रकार म्हणजे अलीकडे उत्पन्न झालेले अत्यंत भयंकर द्वैत असे जगाला दिसते. पण हे जे द्वैत दिसते त्याचा अर्थ एका समाजाचे अनेक तुकडे पडले असा नाही, तर दृढीकरणाचे कार्य अपूर्ण राहिले असा आहे.' (पृष्ठ ३८२) एक मोठे बलिष्ठ राष्ट्र निर्माण करण्याचा उपदेश करणारे व्यापक विचार आणि भावना हिंदुस्थानात उदय न पावल्याने येथे पाहिजे ते ऐक्य घडून आले नाही. जातीची कल्पना व नंतर एकदम मानव्याची कल्पना अशा दोनच ऐक्याच्या कल्पना प्राचीन हिंदू लोकांस अवगत होत्या. हिंदूंनी जरी सर्वव्यापी असे समाजव्यवस्थाशास्त्र निर्माण केले तरी सर्व जग आपले म्हणून स्वीकारील असे ह्या व्यवस्थेचे स्वरूप नव्हते व नाही. हिंदुस्थानचे राजेरजवाडे ब्राह्मणांची मदत घेऊन जग जिंकू शकले नसते तर, किंवा ब्राह्मण इतर सर्व लोकांचे पुरोहित झाले असते तर, त्यांच्या सामाजिक विचारांना सर्वत्र मान्यता मिळाली असती. (ही वाक्ये जशीच्या तशी Hinduism: its Formation and Future' ह्या ग्रंथात पाहावयास सापडतात.)
 ह्या वाक्यांमध्ये केतकरांचे हिंदू समाजशास्त्राबद्दलचे विचार पूर्णत्वाने दिसून येतात. 'हिंदुस्थान आणि जग' ह्या विभागात (पृ.२३५ ते ४४२) चातुर्वर्ण्य संस्था व ती टिकविण्यास काय प्रयत्न करावे ह्याबद्दल ब-याच विस्ताराने विचार केला आहे. त्यात मुख्य कल्पना खालीलप्रमाणे आहेचातुर्वर्ण्यसंरक्षण हा आपला प्रथमधर्म आहे. समाजात चार वर्ण आहेत, अधिक नाहीत. प्रत्येक वर्णाचे पृथकत्व गुणविभिन्नतामूलक आहे. निरनिराळे वर्ण व समाज ह्यांचा संबंध अवयव व अवयवी असा आहे. अध्ययनादी क्रिया, संरक्षणादी क्रिया, द्रव्योत्पादक व्यवहार व लोकांची सेवा या क्रिया ज्या समाजात नाहीत असा समाज असणे अशक्य आहे; व चातुर्वण्र्याचे अस्तित्व स्वाभाविक आहे. मग ह्या गोष्टीचे संरक्षण ते काय करावयाचे?' ह्या प्रशाला केतकर उत्तर देतात की, 'आपले वर्णभिन्नत्व केवळ क्रियाभिन्नत्वमूलकच नाही- आपले चातुर्वर्ण्य संस्कारांकित आहे. आणि चातुर्वर्ण्य टिकवायचे असेल तर (१) संस्कार वर्णानुरूप असून गुणकर्मावरच अवलंबून पाहिजे. (२) वर्णनिर्णयार्थ इतिहासापेक्षा सद्य:कालीन प्रत्ययास अधिक महत्त्व पाहिजे ही क्रिया करताना एखाद्या व्यक्तीस कर्मानुसार उच्च किंवा नीच वर्णात घालावयाचे असल्यास त्याने आपल्या कुलाचा व बांधवांचा संबंध सोडावा की