पान:आमची संस्कृती.pdf/101

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे


९४ / आमची संस्कृती

खरे, परंतु ह्याच कल्पनांत सध्या दिसून येणा-या द्वैताचा उगम आहे हे विसरता कामा नये. बहुतेक नव्या जातींना शूद्र म्हणून समाजात नीच स्थान देणे, म्हणजे दृढीकरण करणे खासच नव्हे. हिंदूंच्या घटनापद्धतीने समाजाचे संपूर्ण दृढीकरण होणेच शक्य नव्हते. शूद्र म्हणून ब्राह्मणांनी दूर केलेल्या वर्णातून महंमद, ख्रिस्त व बुद्ध ह्यांना मुख्यत्वे अनुयायी मिळाले. अर्थात आपले सध्याचे राज्यकर्ते ब्रह्मद्वेष पसरवितात असेच न म्हणता ब्राह्मणद्वेष सामान्य जनतेत केव्हाही चटकन पसरविता येई हे म्हणणे इतिहासास धरून होईल. महंमदी व ख्रिस्ती धर्म मनुष्यप्रणीत, अतएव असहिष्णू व दुराग्रही संप्रदायस्वरूपाचे आहेत, आणि त्यांच्या आक्रमणाचा इतिहास जुन्या संस्कृतीचे संवर्धन करून नव्याची भर घालण्याच्या स्वरूपाचा नसून मुख्यत: विध्वंसनाचा आहे, हे प्राचीन भारताविषयीचे केतकरांचे विधान बव्हंशी खरे आहे; आणि सध्याच्या रानटी समजल्या जाणा-या मनुष्यजातींचा इतिहास पाहिला तर ह्या म्हणण्याची सत्यता अधिक पटेल. हे सर्व जरी खरे, तरी खालच्या वर्णाच्या लोकांना आकर्षक भासणारे ह्या संप्रदायातील मानवांच्या समतेचे तत्त्व आहे, हे मान्य केले पाहिजे. भारतीयांच्या एका काळच्या उज्वल संस्कृतीकडे पाहून हिंदू धर्माचे सर्वव्यापी व प्रभावी स्वरूपात पुनरुज्जीवन होईल, अशी केतकरांची कल्पना होती.
 मनुष्यप्रणीत संप्रदायांच्या द्वेषमूलक व स्पर्धाजनक मगरमिठीतून मनुष्यांची सुटका होऊन सर्व जग सहिष्णू व परस्परसाहाय्यक धर्मतत्त्वाच्या अंमलाखाली सुखाने नांदेल, हे गोड स्वप्न केतकरांप्रमाणेच जगातील इतर आशावादीही आपल्यापुढे रंगवीत आहेत. मात्र जगातील अन्याय विषमता केवळ धर्मभिन्नत्वामुळे उत्पन्न झालेली नसून ती ब-याच अ" आर्थिक गोष्टींवरून आलेली आहे, हा सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे; आणि आर्थिक विषमता नाहीशी झाली म्हणजे सर्वास ला पडणाच्या साधारण मानवधर्माची निर्मिती होईल, अशी कित्य समाजशास्त्रज्ञांना व समाजधुरीणांना आशा आहे. केतकरासारख्या आत्यंतिक आशावादी समाजशास्त्रज्ञाच्या कामगिरीचे सिंहावलोकन छ' आशावादावरच संपविणे योग्य होणार नाही काय?