पान:आपले आभाळ पेलताना.pdf/९३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

धुळयात यावे. आणि नंदाच्या कुटुंबात .... घरात राहावे. कामधंदा करावा, दारू, जुगार, पत्ते चालणार नाही. आता घर नंदाचे, तिच्या मुलाचे असेल. ही तिची ठाम भूमिका होती.

 ज्येष्ठी पौर्णिमेस नंदाचा उपास होता. मी न राहवून विचारलेच. "नंदा, आम्हाला पता न लागू देता वटसावित्रीचा उपवास करतेस. करवी चौथ केलीस. तीजेला पिंडा करून, केतनच्या हाताने तो कापून सर्वांना देतेस. मग जीवनधरकडे जायचे नाही असे का म्हणतेस ?" .......मी विचारले.

 दिलासा घरात येईपर्यंत नवऱ्याच्या जाचाला आणि माराला कंटाळलेल्या मनातही 'पती हाच परमेश्वर' हे वाक्य गोंदलेले होते. माझी बाई मला इथे येईपर्यंत जतावून सांगत होती ती, नंदू तुझ्या पतीची बुद्धी काही काळापुरती फिरली आहे. पण हनुमानजी त्याला परत ठिकाणावर आणतील. तुझा परमेश्वर पतीच. त्याला दुवा देत जा. मला कळायला लागले तेंव्हापासून, पती हाच देव आणि त्याच्या दारात, पती आगोदर मरणारी बाई सर्वात भाग्यवान हेच ऐकलेले. जोरात बोलले वा दणदण पाय वाजवीत चाललं की बाई ओरडे....ए हलक्या आवाजात बोल. सासरी अशी वागलीस तर आमची अब्रू बाहेर टांगशील.... पापड आवाज न करता, तोंडातल्या तोंडात खायचा. शिळी भाकरी आवडीने खायची. जाता येता खायचे नाही. या साऱ्या गोष्टी तिने लहानपणापासून शिकवल्या. थेंबभर दुधाचा चहा अधूनमधून प्यायला लावी. का तर हालाची आताच सवय व्हावी.

 ....मेंदूचा डबा बुडाशी भरलेला असतानाच झाकण गच्च बसवून टाकले. तो डबा कधी भरलाच नाही. पण इथे दिलासात आल्यापासून क्षणोक्षणी विचार करायला शिकले. मोर्चात सामील झाले. जगात काय घडतय, देशात काय घडतंय हे वाचण्याची संधी मिळाली. मला वाचनाची खूप आवड. पण पुडीचा कागद वाचूं लागले तरी पिताजी रागवत. शिकलेल्या बाईचा संसार चांगला होत नाही असे ते म्हणत. पण इथे आल्यावर मेंदूच्या डव्याचे झाकण कधी मोकळे झाले आणि उघडले ते कळलंच नाही. माझ्यापेक्षाही दुःखी, अडचणींना व अत्याचारांना बळी पडलेल्या मैत्रिणी भेटल्या. त्यांच्याकडे पाहून माझे दुःख फिके वाटू लागले आहे. त्या परिस्थितीला तोंड देण्याची हिंमत माझ्यात आली. स्वत:च्या कष्टाने घर

आपले आभाळ पेलताना/९१