पान:आपले आभाळ पेलताना.pdf/९४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

उभारण्याची जिद्द उभारली.

 ....पण तरीही ... भाभी, लहान वयात झालेले संस्कार.... तेव्हा मिळालेली शिकवणूक अंगावर उठलेल्या फोडांसारखी असते. फोड फुटून बरा झाला तरी वण कायमचे राहातात. मनाला कितीही पटले तरी व्रत वा उपवास केल्याशिवाय आंघोळ केल्यासारखे वाटत नाही. भाभी, कुणी सांगावं, आणखीन पाचदहा वर्षांनी हे वणही साफ होतील.

 एवढे रामायण घडून गेल्यावर, मी जेव्हा नव्याने घर उभारीन ते माझे नि मुलांचेच असणार. मुलांच्या पप्पांनी यायचे तर जरुर यावं. पण, माझ्या घराच्या चौकटी मान्य करून. एकोणनव्वदच्या अखेरीस आलेली नंदा नव्वदच्या ऑगस्ट मध्ये बोलणाऱ्या केतनला घेऊन माघारी धुळ्याला गेली. आज तिचे घर उभे आहे. जीवनधरला त्या घराच्या भिंती भावल्या नाहीत. तो त्या घरात आला नाही. आज नंदा दुकानात काम करते. उरलेल्या वेळात फॉल पिकोचे काम करते. अधूनमधून पत्र येते. त्यात लिहिलेले असते,
"मेरा और केतन का ऑल मानवलोक फॅमिली को धुलीया से अंबाजोगाई तक साष्टांग प्राणाम पहुँचे. मेरे घर आना.

बीच मे है देवल, आजू बाजू मे गुलदस्ते
खत लिखना समाप्त हुआ, फिरसे कहेती नमस्ते...."

आपकीही नंदा. 


नंदासारख्या हजारो... लाखोजाणी. ओढणीच्या घूटनमध्ये गुदमरणाऱ्या. त्यांना त्यांचे घर, जे त्यांच्या जोडीदाराचेही असेल, ते कधी मिळणार?

आपले आभाळ पेलताना/९२