पान:आपले आभाळ पेलताना.pdf/९१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तो चाल्यो हो ना?"

 हा प्रश्न अनेकांच्या तोंडून येण्याआधीच नंदाने चारसहा महिन्यासाठी एखादा व्यवसाय शिकण्यासाठी इतरत्र जाण्याची इच्छा विजयाताई चौकांकडे व्यक्त केली. आणि त्यांनीच तिला मनस्विनी महिला प्रकल्पाच्या दिलासा घरात केतनसह पाठविण्याचा निर्णय घेतला. तिच्या केतनची जीभ थोडी जड होती. ऐकू चांगले येत असे. त्यामुळेच तो चांगले बोलू शकेल अशी आशा वाटे. केतनला उपचार करण्यासाठी परगावी नेले आहे अशी हूल उठवून नंदा अंबाजोगाईत पोचली.

 आल्या दिवसापासून ती सर्वांच्याच मनात शिरली. ती आली त्याच वेळी संस्थेच्या स्वयंपाकघरात डिझेल आणि लाकडाच्या तुकड्यांपासून तयार होणाऱ्या गॅसवर चालणारी शेगडी आणली होती. लाकडाचे तुकडे तयार करण्याच्या हात यंत्रावर काम करण्यास दिलासातील महिला तयार नसत. खरे तर ते काम युक्तीचे होते. शक्तीची गरज नसे. पण युक्ती समजावून घ्यायला लागते. त्यासाठी मन स्थिर ठेवावे लागते. ठेंगणी नंदा हे काम हौशीने आणि सफाईने करी. फॉल लावणे, पिको करणे हे काम ती सहजपणे शिकली. शिवणकाम, भरतकामात तरबेज झाली. केतनला जिभेसाठी डॉक्टरांनी विशिष्ट व्यायाम सांगितला होता. तसेच ठराविक जागी चोळायला सांगितले होते. नंदा हे सारे नियमितपणे करी. केवळ केतनकडेच नाही तर दिलासातील इतर महिलांच्या मुलांकडे ती लक्ष देई. उजव्या हाताने न सांडता, एका जागी बसून जेवावे. संडासात शी करावी. हात साबणाने धुवून पुसावेत. जेवणात पालेभाजी, कोशिंबीर, उसळी असाव्यात यावर तिचा भर असे. यामागचे कारण एकच. वर्तमानपत्र, मासिके, पुस्तके वाचण्याचा नाद. गाण्यात तर एकदम तरबेज. राजस्थानी, गुजराती लोकगीते छान म्हणायची. मराठी बोलताना अडखळे. पण हिंदी मात्र विलक्षण गोडव्याने बोले. आणि त्यामुळेच तिला मराठी गाण्यांपेक्षा "तीन गज की ओढनी" हे गाणे फार आवडे. दर बुधवारी महिलांच्या बैठकीत हे गाणे म्हटले जाणारच.

 ...तीन गज की ओढनी,
 ओढनी के कोने चार, चार दिशाओंका संसार......

आपले आभाळ पेलताना/८९