पान:आपले आभाळ पेलताना.pdf/९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

एकीने सांगितले ते असे-

 आपले पुरोगामी म्हाणवणारे पतिराजसुध्दा कही कधी विचित्र वागतात. एकदा आमच्या शेतातला सालदारा ह्यांच्याशी बोलत होता. दोघांचेही आवाज थोडे चढले. सालदाराने सकाळीच माझ्या कानावर त्याची अडचण सांगितली होती. म्हणून मी बाहेर येऊन त्यांना समजावू लागले तर त्यांनी चक्क आवाज चढवला. बाहेर का आलीस तू? बायकांचं काय काम आहे इथं? आम्ही आमचं पाहून घेऊ. तू पहिले आत जा. वाटलं, माझ्यावर वीज पडतेय. पण गप्प बसले नि आत गेले. आत माझी कॉलेजला जाणारी मुलगी होती. तिचेच डोळे भरून आले होते. माझा हात हातात घेऊन ती म्हणाली, "कभी कभी पिताजी कितना अन्याय करते है तुमपर माँ ! कैसे सहेती है तू?" हा झाला एका उच्च विद्याविभूषित कार्यकर्तीचा अनुभव. तर, दुसरा आमच्या सयाबाईचा ती म्हणाली, आमी मांग हाव. आमच्यात पुरुष बायकोला मारतातच. न्हाय मारलं तर त्याला बाईलवेडा म्हणतात. आमचे मालक बी उगा मारायचे. काराण नाय की काय नाय. मजुराला जशी हप्त्याला हजेरी मिळते, तसा मला मार मिळायचा. पन जवापासून ते संवस्थेत काम कराया लागले तवापासन मार बंद झाला. मग मीच इचारलं - आताशा मार न्हाई काई न्हाई. तुमचं मन दुसरीवर तर न्हाई बसलं ? तवा म्हनाले "येडी का काय तू ? बाई बी माणूस हाय. ती काय जनावर हाय? जनावरावर प्रेम करतो आपण. मग लाग्नाच्या बायकोला मार कशापायी द्यायचा? " माइया नावानं बँकेत पैसे बी ठिवलेत आता त्यांनी.

 गेल्या ३० वर्षात कितीतरी जणी मला भेटल्या. त्यांच्या नकळत त्यांचे अनुभव मी माइया पदरात भरुन घेत होते. त्यातूनच १९८४ साली मानवलोकसंचलित 'मनस्विनी महिला प्रकल्पा'चा जन्म झाला.

 'मानवलोक' या स्वयंसेवी संस्थेची आधारशिला राष्ट्र सेवादल. विकेंद्रित लोकशाही, समाजवाद, विज्ञान निष्ठा, सर्वधर्मसमभाव, सामाजिक न्याय या तत्त्वांवर श्रध्दा ठेवून राष्ट्रप्रेमाची शिकवण देणाऱ्या, लहान मुले व तरुण यावर संस्कार करणाऱ्या राष्ट्रसेवा दलाने महाराष्ट्रात हजारो धडपडणारी मुले निर्माण केली. अनेक घरे सेवादलमय केली. अशाच एका घरात मी वाढले. बाईचे माणूसपण आमच्या घरात स्वयंभूपणे मान्य केलेले होते. राष्ट्रसेवा दलाचे भाऊ रानडे धुळ्याच्या घरी नेहमी येत. लहानपणी

आपले आभाळ पेलताना/७