पान:आपले आभाळ पेलताना.pdf/८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
हरेक वेदनेचा रंग वेगळा


 स्त्रीच्या असहायतेचे रूप अनेक रंगी नि. अनेक तऱ्हेचे असते. शोभादर्शक यंत्राला जरासा धक्का लागला की आतली आकृती अगदी नवे रूप घेते. जे यापूर्वीही नव्हते नि पुढेही नसेल असे. अगदी तसेच बाईच्या 'बाईपाणा' तून येणाऱ्या दुःखाचे, वेदनेचे, असहायतेचे रूप आहे. प्रत्येक प्रश्नाचा पोत वेगळा नि रंगही वेगळा.

 मला आठवते तशी ही अनेक विविध रूपे माझ्या मनावर नकळत गोंदली गेली..... मीरा सारळकर, सुरेल आवाजात गाणारी. तिच्या गाण्याचा केवढा दिमाख असायचा, वार्षिक स्नेहसंमेलनात आमचे गायनाचे सर मोठ्या अभिमानाने तिला तबल्याची साथ करायचे. जणू त्यांची नजर म्हणत असायची, पाहा कशी तयार केलीय मी ही शिष्या. पण तिचे लग्न ठरले ते एका गावातल्या औरंगजेबाशी. तिचा तंबोरा माहेरी धूळ खात पडलाय. आणि ती ? तिच्या 'साहेबांच्या' प्रचंड घरातल्या शो-पीससारखी , सूरं हरवून जगतेय, आणि शकू? आम्ही मॅट्रिकला असतानाच तिचे लग्न ठरले. मार्चमध्ये परीक्षा नि लग्नाचा मुहूर्त फेब्रुवारीत. शकू गणित आणि सायन्स मध्ये भलती पक्की जणू जिभेवर आकडे नाचायचे आणि केमेस्ट्रीतील तापदायक समीकरणंही ! पण 'आपले लग्न थोडे पुढे ढकला' असे सांगण्याची हिंमत ती कुठून आणणार? गेली पस्तीस वर्षे ती उसने हसू ओठांवर घोळवीत आणि पक्क्या गणिताच्या विलक्षण गोड कथा आपल्या मुला-नातवांना सांगत सुव्यवस्थितपणे संसार करतेय.

 मला नेहमी प्रश्न पडतो. अशा लाखो स्त्रियांच्या फुलण्याआधीच कोमावलेल्या गुणांचा, कलाशक्तीचा, बुध्दिमतेचा साठा किती मोठा असेल बरं? त्याचा स्फोट कधीच होणार नाही काय?

 खरे तर आम्ही स्वत:सुध्दा स्वतःला मुरड घालतच जगत असतो! आमच्या शिबिरात आम्ही एकदा चर्चा केली. ती अशी, की आपल्याला. स्वत:लाही आपल्याच पतिराजांकडून कशी अन्यायकारक वागणूक मिळते. सुरुवातीला सगळ्याजाणी जरा बोलायला बिचकतात. पण एकदा का मात्र झाकणे उघडली गेली नि ----

आपले आभाळ पेलताता/६