पान:आपले आभाळ पेलताना.pdf/८८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यावेळी सहकार्य करणाऱ्या वकील महिलेचे पत्र आले होते. नंदा नावाच्या तीन चिमुकल्यांची आई असलेल्या परित्यक्तेला, शिवण प्रशिक्षणासाठी दिलासा घरात प्रवेश हवा होता. धाकट्या मुलाला घेऊन ती येणार होती. स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध जीव झोकून काम करणाऱ्या विजयाताईच्या संस्थेतून येणारी महिला नक्कीच अडचणीत असणार. तिला पाठवून देण्याबाबत तात्काळ पत्र पाठवले. एका संध्याकाळी नंदा छोट्या केतनसह दिलासा घरात दाखल झाली.

 नंदा जेमतेम पाच फूट उंचीची. नाजूक चणीची. मासोळीच्या आकाराचे काजळभरले डोळे. भांगात सिंदुराची ठाशीव सरळ रेघ. माथ्यांवर पदर. पायात छमछमणाऱ्या घुंगराच्या बिछुड्या म्हणजे जोडवी. बोलण्या-चालण्यात गरब्याचा अदृश्य ठेका.

 'प्रणाम दीदी. माधुरीताईने लेटर दिया है. घरमे सब खुशहाल है. केतन दीदी को प्रणाम करो..' अस म्हणत तिने केतनला माझ्या पायावर आडवा घातला. गंगामावशीला प्रणाम केला. नंदाच्या बोलण्यातला गोडवा पहिल्या क्षणीच सर्वांना भावून गेला. प्रत्येक प्रांताचे, भाषेचे, समाजाचे काही पारंपारिक वेगळेपण असते. नंदाच्या वागण्याबोलण्यातून ते जाणवत असे.

 धुळ्याच्या सातव्या गल्लीतील हनुमान मंदिराचे पुजारीपण परंपरेने तिच्या वडिलांकडे आले होते. मंदिराच्या भवताली गुजराथी मारवाड़ी समाजाची वस्ती. भाविक लोक देवाला रोज काही ना काही उपहार चढवीत. साणवार व्रतांची उद्यापने यासाठी सन्मानाने जेवायला बोलवीत. नेहमीच गोडाधोडाचे जेवण, चांगले कपडे आणि पुजारीबाबांची मुलगी म्हणून चारजाणीत विशेष मान. तिला पूजापाठ सांगता येत असे. कोणत्या विधीसाठी काय सामान लागते ते माहीत असे. स्तोत्रं सुरेख म्हणत असे. लग्नात वा इतर संस्काराचे वेळी म्हणायची गाणी येत. ती सातवीत असतांनाच नहाण आले. पुजारीबाबांनी जावई शोधण्याची मोहीम सुरू केली. मुळात पुजारीपण करणाऱ्यांची जात लहान. खात्यापित्या घरी लेक जावी हा आईचा हेका. सुरतेच्या पुराणिकांच्या घरातल्या धाकट्या मुलाशी -जीवनधरशी- नंदाचा विवाह झाला. साल होतं १९८१. जीवनधर १० वी पास होता. हिऱ्यांना पैलू पाडण्याच्या कारागिरीत तरबेज होता. दिवसाला ऐंशी नव्वद रुपये मिळत. नंदा दिसण्यात गोड. नवरा नव्या नवरीचे भरपूर लाड करी. तऱ्हेतऱ्हेच्या

आपले आभाळ पेलताना/८६