पान:आपले आभाळ पेलताना.pdf/८३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दैवाला वाटले जणू आजच लग्न झालेय. गोड गोड बोलणे ....... गोड गोड लाड. दुसऱ्या दिवशी चुलत सासरा, सीताराम काका, हनुमान, त्याचे दोन मित्र नि दैवा तालुक्याला आले. कोणत्याशा हापिसात गेले. तिथला थाट, सुटाबुटातली माणसे पाहून दैवाची जीभ पार चिक्कून बसली. कोट घातलेल्या सायबानं विचारलं "बाई तुला या कागदावर लिहिलेलं वाचून दाखवलं का?. "देवाची मान खालीच. "व्हय म्याच दाखवलं. मी मानलेला भाऊ हाय बाईचा" हनुमंताचा मित्र बोलला.
"बाई तुमची तक्रार नाही का?" साहेब.
"............" दैवा.
"हं. करा इथं सही." साहेब.

 सही बरीक करता येई. तेवढीच काय ती अक्षर ओळख. सामोर कागद. नोटेच्या कागदासारखा करतरीत. वर निळ्या रंगाच्या गिचमिट रेघोट्याच की! कारण काय अक्षर लिहिली आहेत, हे कुणाला कळत होतं? रांगोळी काढावी तशी सही करता यायची तेवढेच ! पण आज सहीची रांगोळीपण आठवेना . शेवटी साहेब म्हणाले अंगठा लावा बाइंचा. दैवाने अंगठा उठवला. सगळे बाहेर आले चुलत सासरे म्हणाले, "हनुमंता, चार दिवस माहेरी नेऊन घालतो पोरीला. पैशे आले की गाडी घेऊ नि मग पोरीला आणू." सासऱ्यांनी माहेरात नेऊन घातले. चापाणी झाले. निघताता दैवाच्या वडिलांचा हात धरुन विनवले, " इवाइंबुवा तुमची लेक तुमच्या दारात आणून घातली. तिचं काय करायचं ते तुमीच बगा. आताच तालुक्याच्या गावाला काडीमोड घेऊन आलो. तुमची पोर गेलं सालभर येड्यासारखी वागती. बायको असून नसल्यासारखी. माझा पुतन्या तरुण हाय. धट्टाकट्टा हाय. त्याला बी संवसार करायची हौस हाय. पन तुमची पोर दगड घेऊन हिंडती... कामाला हात लावीत नाही. हसती तर हसतीच नि रडती तर सडतीचं. तवा मान मोकळी करून घेतली आमी. सायबासमूर सही घेतलीया......."

 चुलत सासरा तरातरा निघून गेला. वडील डोक्यावर आभाळातून दगड कोसळावा तसे बघत ऱ्हायले. शुद्ध गेल्यासारखे. आई दाराआडून ऐकत होती. ती भिंतीवर डोकं फोडून घ्यायला लागली. रडायला लागली. थोड्या वेळात गाव जमा झालं. बायाबापड्या, माणसं, लेकरं. दैवा मात्र दगडासारखी निमूट बसून होती. डोळ्यातले पाणी मात्र आटून गेलेले. आता कसे व्हाणार ते ? बाया आईला म्हणत, पोरीला बाधा झाली. कुणालातरी

आपले आभाळ पेलताना/८१