पान:आपले आभाळ पेलताना.pdf/८२

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सवतीच्या नुसत्या कल्पनेने दैवाचा जीव चोळामोळा होऊन जात असे. एका दिवसाची हकीगत. संध्याकाळची वेळ. दैवा घरात एकटीच. घर कसले? लहानशी झोपडीच. झोपडपट्टीतील. थंडीचे दिवस. सूर्य लवकर बुडतीला लागे. हनुमंताला ... तिच्या नवऱ्याला परळी -गंगाखेड टेम्पोवर नोकरी लागली होती. पण घरी यायला चांगलीच रात्र होई. बाहेर खाऊन पिऊन आडवतायला घरी येत असे. तर त्या संध्याकाळी बंगल्यातल्या सायबिणीनं दिलेला शिळा भाकरतुकडा खाऊन दैवा आडवतली. कधी डोळा लागला कळलं नाही. अचानक जाग आली तर कोणीतरी झोपडीचं कवाड लावून घेतय. नवऱ्याचा मित्र दारु ढोसून घरात आला होता. दैवा किंचाळली. चपल्या मारयतारुन त्याला बाहेर काढले. नेमका त्याचवेळी नवरा का येऊ नये तिथे? तोही दारुत बुडून आलेला. त्याने बायकोचा हात खेचला. फरपटत टेम्पोत कोंबलं आणि टेम्पो सुरु केला. दैवा ओरडतेय. हनुमंत गाडी चालवतोय नि एका हातानी तिला मारतोय. टेम्पो चढावाला लागला. गाडीचा दरवाजा खटकन उघडला नि दैवा खाली ढकलली गेली. समोरुन गाडीचे दिवे लखकन चमकले आणि हनुमंत खाडकन ठिकाणावर आला. कर्रकन ब्रेक दाबून गाडी खडी केली...... उभी केली. अस्ताव्यस्त दैवाला हात लावून पाहिला. जीव जागेवर होता. पण डोक्यातून रक्ताची धार लागली होती. गाडीत घालून थेट अंबाजोगाईचा दवाखाना गाठला. माळवदावरून बायको पडली असे सांगून तिच्यावर उपचार केले. दैवा आठ दिवसात बरी झाली. पण तेव्हापासून तिची नजर बदलली. कोरडी विहीर असावी तशी नजर.. खोल, भेदणारी..... पण निर्विकार. बापाने चार दिवस घरी नेले. पाण तिचे बोलणे, हसणे पार संपले होते. सासरी आली तरी कुणाशी बोलत नसे. मनात आले तर कामाला हात लावाणार. एरवी झोपून राहाणार. नवरा मनातून घाबरला होता. त्याला भय वाटे की हिने जिल्ह्याच्या पोलिस ठाण्यात तक्रार केली तर काही खरे नाही. त्या परिस आहे तशी सांभाळावी. पण दैवाने नवऱ्याशी बोलाणे साफ तोडले. असे एक वर्ष गेले. एक दिवस हनुमान सुरेखशी साडी, बांगड्या घेऊन आला. येताना मिठाई आणली. बायकोला साडी दिली. दैवाच्या ओठावर फिकी रेषा चमकून गेली. रात्री हात धरुन खोलीत गेले. जवळ घेऊन सांगितले, "देवा, आपलं नशीब उघडलं. मला बँकेतलं कर्ज मिळतेय. लोन म्हनतात त्याला. बायांच्या नावानं लोन मिळतय. तुज्या नि माज्या दोघांच्या नावावर कर्ज उचललायचंय. आपण नवी गाडी घेऊया. आता दारु फिरु समदी सोडणाराय मी. तुला डागदराकडे नेईन. औषधापाणी करीन. म्होरल्यासाली पाळणा हललाच पाहिजे बघ घरी......."

आपले आभाळ पेलताना/८०