पान:आपले आभाळ पेलताना.pdf/८४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दाखवा. पण त्यालाही पैसा लागतो. वडील आणि आईचे बोलणे चाले. ही लेक अशी माघारी आली. त्यातून वेड्यागत वागते म्हणून सासऱ्याने आणून घातली. धाकट्यांची लग्न कशी जमायची? हाच घोर त्यांना जाची. दैवाला सारे कळे. पण बंद ओठ एवढे कुलूपबंद झाले होते की मनात आले तरी ते उघडत नसत. मनातल्या मनातच काय ते बोलायचे. शेवटी एका रात्री मनात वेगळाच विचार आला. पहाटे डबडे घेऊन पांदीकडे गेली ती माघारी परतलीच नाही. साखर कारखान्याजवळ येईस्तो उन्हं चांगली भाजायला लागली होती. पाय जडावून गेलेले. पोटात भूक. एका झाडाखाली बसली. थकलेल्या जिवाला कधी झोप लागली ते कळलेच नाही. कुणीतरी हलवून उठवीत होते. डोळे उघडले तर एक बाई हाताला धरुन हलवीत होती. आणि विचारीत होती, "ए पोरी.. कुणाची हाईस ? कुठ निगालीस ? पळून चाललीस जनू ? जिकडे तिकडे लायटी चमकायला लागलेल्या अंधार चोहोबाजूंनी भरून आलेला. उरात भीतीचा पूर भरून आला. त्या बाईच्या हाताचा आधार खूप हवासा वाटला.

 "चल माय माज्या संग, जेऊन घे." बाईचा मऊ आवाज. दैवाला धीर आला. तिच्या बरोबर ती शेजारच्या झोपडीत शिरली. आतला थाट वेगळाच होता. मोठा पलंग. जवळ रंगीत टी.व्ही. स्वैपाक घरातली भांडी चकचकीत. दोन तरुण पोरी वेणीफणी करीत होत्या. दैवा सगळीकडे नजर टाकीत पोटभर जेवली. रात्री जाग आली तेव्हा ती बाई कुणाला तरी दबल्या आवाजात सांगत होती. "पोरगी जानजवान हाय. गोरी बी हाय. महिना पंधरा दीस खुराक दिला की दहाजणीत उठून दिसंल. मा बगा एकांदा टरकवाला. भोवनी झाली की तिकडंच टाक म्हणावं लाइनीला. मला तामुर दोन हजार नेक पायजेत ........"

 दैवाचं मन ऐकता ऐकता थिजून गेलं. पहाट उठून डबा हातात घेऊन संडासला म्हणून गेली. ती झाडाझुडपातून लपत छपत सकाळला डांबरी रस्त्याला लागली. हा रस्ता ओळखीचा होता. तालुक्याला जाणारा. उन्हं डोक्यावर आली तेव्हा ती कोर्टाच्या दारात उभी होती.

 तिने ऐकले होते की कोरटात गेले की बायांना मदत करतात. पण इथे तर नुसती गर्दी. काळे कोट घातलेल्या माणसांची, बायाबापड्यांची नि पुरुषांची. दुपार टळून गेली. संध्याकाळ झाली. कोर्ट बंद झाले. दैवा

आपले आभाळ पेलताना/८२