पान:आपले आभाळ पेलताना.pdf/८१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

होतं. दैवाही घरात रुळायला लागली होती. घरातले काम, शेतातले काम. करण्यात हुशार झाली होती. आठ चार दिवसाला नवरा परळीहून मुक्कामाला येई. येताना चिटाचे कापड तरकधी बांगड्या आणी. पावडरचा डबा नि भिवया रंगवायची काळी पेन्सिल गुपचूप हातात देई. त्याला वाटे की, तो आल्यावर हिने पावडर लावावी, थोडे नीटनेटके राहावे. पण पंधरा वर्षाच्या दैवाला नेमके कसे वागावे कळत नसे. पावडरीचा वास सासूच्या नाकापर्यंत जाईल यानेच ती धास्तावत असे.

 हनुमंताने नवीन चाल चालवली. पोटाचे हाल होतात या निमित्ताने परळीत घर करायचे ठरविले. आणि दैवाची रवानगी परळीत झाली. चार दिवस सासू राहिली. संसाराची मांडामांड करुन ती माघारी परतली. नवा गाव .... नवा संसार.... नव्या ओळखी. गाव बरे होते. दर सोमवारी वैजनाथाचे दर्शन घडायचे. पण काही नव्या गोष्टीही तिच्या ध्यानात आल्या. हनुमान दोन दोन दिवस पुण्या-मुंबईच्या 'लायनी'वर असायचा. घरी आला की धुमाकूळ सुरु. बाटली नि तो. एकमेकांच्या सहवासात. मध्येच जाऊन मटन आणून टाकी. दैवाने मालमसाला घालून मटणरस्सा शिजवायचा. भरपूर पिणे झाले की दोन चार मित्रांना घेऊन तो येई. मग हाताची मनगटे दुखेस्तो भाकरी थापाव्या लागत. कष्टाने मिळालेला पैसा दहा वाटांनी पळून जाई. त्याचे दोस्त म्हाणत, "वा! काय चव हाय वैनीच्या हाताला. झ्याक रस्सा झालाय. ममईच्या हाटलात बी अशी चव नाय मिळायची."

 असे म्हणायला काय जातेय.? नवरापण फुगारून जाई. पैसे पुरेनात म्हणून तिने दोन बंगल्यातली धुणीभांडी धरली. साठ रुपये येत. तेवढाच आधार. पूर्वी नवरा लाइनीवर असताना दारू जास्त ढोशीत नसे. पण हळूहळू सवय वाढली. एक दिवस दारुच्या नशेत, गाडी रस्ता सोडून पलटली. बरे तर बरे तो वाचला. पण मालाची राखरांगोळी झाली. मालकाने दोन महिन्यांचा आगाऊ पगार हातात कोंबून कामावरून कमी केले. हातात पैसा येईना. दारू नि मटनाची सवय तुटेना. मग घरात त्रागा. "लगीन होऊन चार वर्षे झाली तरी लेकरुबाळ होत नाही म्हणून माझं लेकरू दुखी झालया. वंशाला दिवा लागला की समद्या कामात हुरुप येतोया. हिच्यामुळच माझं पोरगं दारुच्या नादी लागलं. हिचा पायगून बरा न्हाई. हिला बापाकडं धाडावं नि नवी सून घरात आणावी.... !" असा सासूचा नवा ठेका सुरु झाला.

आपले आभाळ पेलताना/७९