पान:आपले आभाळ पेलताना.pdf/७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

या मुलींवर होणाऱ्या अन्यायांची नोंद जशी केली आहे तशीच त्यांच्या तरूण मनादेहाच्या हेलकाव्यांची सुजाण दखल घेतली आहे.
 अभावग्रस्त घरातील तारूण्य ही अत्यंत केविलवाणी वस्तुस्थिती आहे. घरातले कळंजलेले वातावरण, आजार दारिद्रयाने गांजलेल्या वडिलधाऱ्यांचे एकमेकातले ताणतणाव या वातावरणात देशाच्या तारूण्याच्या जाणीवेने फुलणारे मन घराबाहेर वाट शोधू पहाते. व्यक्तिमत्त्व फुलविण्याचे शिक्षणासारखे वा कलेसारखे कोणतेच सांस्कृतिक मार्ग खुले नसतात, तेव्हा आपोआप पुरुषस्पर्श हीच आपल्या अस्तित्वाची एकमेव दाद मानणाऱ्या या मुली भरकटत जातात. त्यांच्या आयुष्यातील किमान अपेक्षांची फार मोठी किंमत त्यांना द्यावी लागते. या काहाण्या एकेका मुली-बाईच्या असल्या तरी या लेखसंग्रहात नकळत एक समाजपट उलगडत जातो. कामापाठोपाठ फिरणारा समाज, मध्यमवर्गीय वस्तीच्या कडेकडेला राहून रोजगार करणारा समाज, अज्ञानापोटी अंधश्रध्देने गांजलेला समाज यामध्ये दिसतो. पुरूषत्ताक समाजाची अरेरावी, बाइला वस्तू म्हणून वापरताना मनात शंकाही न येणे दिसते. तसेच बाईचे अप्रश्न पिचत रहाणे दिसते.
 रहाणीमानाचा गुणस्तर उंचावण्याची चर्चा आपण समित्यांच्या पातळीवर सतत करत असताना प्राणीपातळीवरचे जगणेही बाईसाठी अवघड होताना दिसते. हे सारे या लेखांमधून मांडले गेले आहे. प्रारंभी म्हटल्याप्रमाणे कुटुंब या सामाजिक संस्थेच्या मर्यादा जाणवतात. या कुटुंबाचे लोकशाहीकरण झाले पाहिजे. हेही जाणवते. पण संस्था हे सुध्दा एक विस्तारीत कुटुंबच! त्यामुळे याप्रकारच्या संस्था चालवताना येणारे प्रश्न, कार्याच्या परिणामकारकतेच्या दृष्टिकोनातून त्यात होऊ शकणारे बदल याचीही चर्चा झाली असती तर उपयुक्त ठरले असते. शैलाताईंच्या पुढील लेखनात ते येईल अशी अशा आहे.
 हा लेखसंग्रह वाचताना 'स्त्रीप्रश्न' अलग बेटावर ठेवून विचार करता येत नाही हेही जाणवते. समाजाचा समग्र विचार केल्याशिवाय, जगण्याच्या पोताचा विचार केल्याशिवाय स्त्रीच्या सन्मानाने जगण्याचे प्रश्न उमजत नाही. म्हणून तर 'विशिष्ट प्रकरण' समजावून घेताघेता बृहत् प्रश्नाकडे जायला हवे.
 या प्रस्तावनेच्या निमित्ताने शैला लोहिया यांना त्यांच्या पुढील लेखनासाठी आणि 'दिलासा' मधील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

-पुष्पा भावे