पान:आपले आभाळ पेलताना.pdf/७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

नेऊन सोडते. मात्र तुला... एका तरण्याताठ्या बाईला, कोर्टासमोर तिच्या हट्टामुळे सोडलय हे पोलिसांत जाऊन सांगणार मी."

 "मला नाही जायचं कोर्टात. तुमी कुठे गेला वता चार दिवस ? इथं का आला न्हाई. मी फोन करते म्हनलं तर मम्मी रामावली मला. मी चा पिऊन हितंच बसणारेय...."

 तिच्या या बोलण्यामुळे हसावं की रागवावं हे कळेनासं झालं. "दैवा, तुझं खरं नाव, खरं गाव सांगितलंस तरच मी तुला इथं ठेवून घेईन. दहा दिवस झाले तुला येऊन, पण तू कुणाशी बोलत नाहीस. काय ?" मीही वैतागून बोलले. मग मात्र दैवाने माहिती दिली.

 दैवाचं माहेर कान्हेरीचं. वडिलांकडे दोन एकर शेती. पण कोरडवाहू. वडील पाटलाच्यात सालदारी करायचे नि घरी खरिपाचे पीक घ्यायचे. माय शेतात रोजगार करायची. दैवाला दोज मोठ्या बहिणी. एक लगीन झाल्यावर सहा महिन्यांनी विहिरीत पडून मेली. दुसरीचा नवरा मुंबईला ड्रायव्हर म्हणून काम करतो. ती भारजाला सासरी राहाते. तो अधूनमधून येतो. दैवा तिसरी. तिच्या पाठीवर एक भाऊ. पुन्हा दोन बहिणी. "आमची माय एकतर गरवार असायची न्हाईतर लेकराला अंगावर पाजत तरी असायची. नि शिवाय मरेस्तो काम. आमी भैणी शेण गोळा करायचो. गवऱ्या थापायचो. पानी आनायचो. सरपन गोळा करायचो." दैवा

 दैवा दिसण्यात उजवी. गुलाबी गोरा रंग. मोठे मोठे डोळे. सरळ नाक. दिलासा घरात आली तेव्हा केस खांद्यापर्यंत कापलेले होते. ते नवऱ्याने कापले होते म्हणे! लग्नाच्या वेळी कमरेपर्यंत वेणी यायची. दैवा वयात आली तेव्हा होती बारा वर्षाची. पण मुलगी वयात येताच आईबापाला लागतो घोर. डोक्यावरचे ओझे फेकून द्यावे तशी नवऱ्याच्या दारात लेक ढकलून मोकळे व्हायचे पाहातात. चौदाची असतानाच दैवाचे लगीन ठरले. नवरा हनुमान नवलवाडीचा सातवीपसवर शिकलेला. मालट्रकवर क्लिनर.... किन्नर होता. वीस रुपये रोज मिळत असत.

 लग्न झाले नि दैवा सासरी आली. लग्न होईस्तोवर शेळ्यामेंढ्यांच्या मागे हिंडणाऱ्या दैवाला रसदार स्वैपाक जमत नसे, भाजी भाकरी करता येई.

आपले आभाळ पेलताना/७७