पान:आपले आभाळ पेलताना.pdf/७८

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दैवशाला दिलासा घरात राहू लागली. तिचं गाव आमच्या अंबाजोगाईच्या जवळचंच आणि माहेर पुढे चार कोसांवर. शिक्षण शून्य. लहानपणी शाळेत घातले होते. पण मास्तर एक नि शाळा चौथी पसवर. मास्तरांचा डोळा चुकवून घरी पळून जायला मजा वाटायची. झाडावरची जांभळे, पेरु, कैऱ्या, सीताफळे शिवाय रानातल्या कामुन्या यांची हाक कानावर कायमच असायची. मग काय? बापानेकाढून घेतले नाव शाळेतून नि रवानगी केली शेळ्यांच्या मागे राखोळी म्हणून. हे काम मात्र दैवाला खूप आवडायचे. त्या गमतीजमती सांगताना दैवाचे तेजदार डोळे पार हरखून जात. ती सांगे "ताई मास्तर कमळाचा 'क' शिकवायचा. आता कमळ कुठं बगितलया वो आम्ही ? काळं की गोरं ते! मी मास्तरला म्हनलं की .... गुरुजी कणगीचा 'क' शिकचा की, आमाला कणगी म्हाईत हाय. तर केस धरून वढले पहा....." .
"ताई, बदामी बकरीचे डोळे लई सुंदर होते. काळं रेशमी अंग इतकं मऊसूत की इचारू नका. दुदूबी भरपूर द्यायची. तिची चार बाळातपणं मी क्येली. पन लेकरून वो ! जरासं मोठं झालं की माजा बाप अंबाजोगाईच्या मटन खानावळीत टाकायचा. तवा मातर लई रडून यायचं."

"तू खात नाहीस मटन ?" कुणीतरी दुसरी विचारी.
"आन आता ? आठ दिस न्हाई जिभेला लागलं तर समदं अळणी वाटतंय. मटन तर हवंच. पण आपल्या बकरीचं नकोना"
तर अशी ही दैवा आठ-पंधरा दिवस धड राहिली. एक दिवस सकाळी फोन खणखणला. "ताई दैवा भयंकर त्रास देतेय. रात्रभर आम्ही जागे आहोत. अंगावर रॉकेल ओतून घेत होती. तुम्ही येता ता इकडे ?' संस्थेतील प्रमुख संवादिनी श्यामा बोलत होती. मी लगेच पायात चपला सरकवल्या.

....... समोर दैवाचा अवतार होता. अंगावर ओरखाडून घेतलेले. डोळे लाल झालेले. विस्कटलेले केस. हातातल्या बांगड्या फुटलेल्या. मनगटावर रक्ताचे ठिपके. आमच्या संस्थेतील सर्वांच्या 'मम्मी' गंगाबाई तिला धरुन बसल्या होत्या. मला पाहाताच तिने सूर काढला. 'काई ऱ्हायचं नाई मला तुमच्या संवस्थेत. दोन येळला खायला दिलं तर काय उपकार केल्ये का? या मम्मीला हाकलून द्या. माजं सामान द्या. कोरटात नेऊन हुबं करा मला..... तिचं असंबद्ध बोलणं आतून जोडलेलं होतं. मी तिचा हात धरून ऑफिसमध्ये नेलं. आणि पाण्याचा पेला तिच्या हातात बळेच दिला नि म्हटलं, "आधी पाणी पी. चूळ भर. चहा घे नि मग तुझं सामान आण. तुला कोर्टासमोर

आपले आभाळ पेलताना/७६