पान:आपले आभाळ पेलताना.pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

तसे नाजूक इवलेसे ओठ. हसली की डाव्या गालावर खळी पडे. दाट कुरळे केस. किंचित सोनेरी .. तपकिरी रंगाचे. ठेंगणा बांधा. फाटक्यातुटक्या कपड्यातली सुधी देखणी दिसे.

 एक दिवस बाबूचा मित्र नेकनुराहून एका तरुण माणसाला घेऊन आला. त्याची गावात दोन पानाची दुकाने होती. दिवसाला शंभर रुपये थेट पदरात पडत. गावात घर होते. जवळच्या खेड्यात आठ एकर पाणभरताची जमीन होती. घर होते. दारात जनावरे होती. घरात म्हातारी माय होती. धाकटा भाऊ होता. चार वर्षापूर्वी या माणसाचे लग्न झाले होते. बायको पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली. ती लेकरु दहा महिन्याचे झाले तरी सासरी परतलीच नाही. दोनदा नवरा घ्यायला गेला. दोनदा मुऱ्हाळी पाठविला. पण ती येईना. खात्यापित्या घरातली लाडकी लेक होती. मुलगी वर्षाची झाली की पाठवू, तोवर जावयानेच अधूनमधून यावे असे सासरेबुवांनी सुचवले. जावई चिडला. "एक नाही तर चार बाया दारात हुब्या करीन." अशी धमकी देऊन घरी परतला आणि मित्रासोबत सुधीला पाहण्यासाठी आला.

 सुधी पाहताक्षणी आवडली. दुसऱ्या दिवशी खंडेश्वराच्या देवळात जाऊन माळा घातल्या. नवी नवरी घेऊन संदीपान आपल्या दुसऱ्या बायकोला घेऊन नेकनुरात आला. भरपूर लाड... छान छान साड्या. पोट भरून खायला. सुधी दिवसागणिक उजळत होती. नाकात सोन्याची नथ. कानात झुमके. कपाळावर भलामोठा सूर्य. गौरीसारखी दिसे. लग्न होऊन पांच सहा महिने झाले तोच सुधीला घेऱ्या येऊ लागल्या. पाय जड झाले. मग तर कोड कौतुकालाही उधाण आले. सुधी मुलाची माय झाली. संदीपान पोराचा बाप झाला. दिवस कसे छान चालले होते. आणि एक दिवस पोस्टमनने संदीपानच्या नावाने रजिस्टी चा कागद आणला. पहिल्या बायकोने नवऱ्याला वकिलामार्फत नोटीस पाठवली होती. बीडचे एक चांगले वकील तिच्या भावकीतले होते. संदीपानही दुसऱ्या वकिलाला जाऊन भेटला. "चार बाया दारात उभ्या करीन" असं म्हणणे सोपे होते. पहिल्या पत्नीला रीतसर काडीमोड न देता दुसरी बायको करणे कायद्याच्या दृष्टीने फार मोठा गुन्हा होता. त्यासाठी हातकड्याही पडतात. हे सारे कळल्यावर संदीपान घाबरला. पहिली बायको शालू बऱ्या घरची होती. तिनेही दोन वर्ष चांगला संसार केला होता. खरे तर तिचीच गोडीने समजूत घालायला हवी होती.

आपले आभाळ पेलताना/६१