पान:आपले आभाळ पेलताना.pdf/६४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

दुसरी बायको केली तर आपला केस कोण वाकडा करणार? असे त्याला वाटे. मित्रही म्हणत,
"लेका कर दुसरी बायको. कोन काय म्हनत न्हाई. कायदा कोरटात. मोठ्या शहरात, इथं कोन त्याला मानतयं? कितीक मानसं दुसरी बायकू आणतात. तू काय नवं करतूस व्हय?"

 संदीपान वकिलाला जाऊन भेटला. वकिलाने संदीपानला सल्ला दिला. दुसऱ्या बायकोला पढवा नि ती बहीण आहे असे धट्टाऊन सांगायला लावा. पुढचे पुन्हा पाहू. पण या गोष्टीला सुधी मुळीच तयार होईना. नोटिसा घेऊन पोलिस येऊ लागले. लपता भुई थोडी झाली. धंद्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ लागला. या साऱ्या प्रकरणात सर्वात निर्दोष असलेली सोळा वर्षाची सुधी बळी ठरली. घरी नवऱ्याचा मार सुरु झाला. सासू घालून पाडून बोले. जेवायला अर्धी चतकोर भाकर नि लाल तिखट मिळे. जणू घर उलटे फिरले. एक दिवस संदीपान सुधीला आणि तान्ह्या बिंडू ला ... नितीशला दगडवाडीला; सुधीच्या माहेराला सोडून आला. माहेरी तर अठरा विश्वे दारिद्र्य म्हातारा बाप रोजगार हमीच्या कामावर जाई. भाऊ दुष्काळात मुंबईला गेला. तो तिकडेच होता. बापाला मिळणाऱ्या दहा रुपयात लेकराला दूध कुठून मिळणार ? मग सुधीही कामावर जाऊ लागली. 'बराशी' खंदू लागली. महिना निघून गेला. नेकनूराहून येणाऱ्या बातम्यांकडे तिचे कान लागलेले असत. कोणीतरी सांगितलं की संदीपानने पहिल्या बायकोला आणि लेकीला आणलेय. समदे आपसात मिटलेय. अलीकडे सुधीही वैतागून बापावर कडाडे.

 "म्हातारपनी कशाला जलमाला घातलंत दादा ? दुसरेपनावर देण्यापरीस हिरीत ढकलून द्यायचं व्हतं. मी तर कशी बी जगेल. पन ह्या लहानग्यानं काय पाप केलंय? त्याच्या बिगर मी तरी कशी जगू? नि त्याला कुठून खाऊपिऊ घालू ? शिक्षान देऊ ? मला बी साळत घातलं न्हाई तुमी. लई मोठं पाप क्येलं दादा तुमी. कुठं फेडाल ?..: "

 इकडे संदीपानच्या घरातलं वादळ शांत झालं होतं. शालूचा राग होता. पण त्याच्याकडे कोण लक्ष देणार? पण लहानग्या बिट्टूची मात्र संदीपानला सारखी आठवण येई. सुधी लोकाच्यात काम करते. बापाला काम होत नाही. लेकरु वाळलेय असे कानावर येई. मन चळबळून उठे.

आपले आभाळ पेलताना/६२