पान:आपले आभाळ पेलताना.pdf/६१

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
सुधामती..... , भेगाळ भुईवरून भरारणारी!!!



"ताई ओळखलंत का मला?"

 समोर बसलेली तरतरीत तरुणी मला विचारीत होती. मी मेंदूला खूप ताण दिला. पण काही केल्या डोळ्यासमोर नाव येईना, की व्यक्ती पाहिल्याची खूण पटेना. माझे गोंधळलेले डोळे... चेहरा पाहून ती हसली.

 'ताई मी सुधामती आणि हा तुमचा लाडका बिंडू. खूप दिवसात भेट नाही. आठवण तर यायचीच मला. पण यायला जमलं पाहिजे ना?' सुधामती म्हणाली आणि अचानक माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली आठ वर्षापूर्वीची सुधामती. पाठीवर कोयत्याची जखम, सुजलेला चेहरा, पायानं धड चालता येत नव्हते, दूधपिते लेकरू नवऱ्याने हिसकाटून नेलेले अशी एक हताश आई नि बाई. मनस्विनीच्या दिलासा घरात आश्रय घेण्यासाठी आणि आपले दहा अकरा महिन्याचे बाळ परत मिळावे म्हणून कायद्याची मदत मागण्यासाठी, म्हाताऱ्या बापाला घेऊन सुधामती आली होती.

 तिचे माहेर डोंगरातल्या दगडवाडीचे. लहान असतानाच आई मेली. घरात म्हातारा, कोरडी जमीन आणि वेशीच्या आत लहानसं पडकं घर एवढीच काय ती जायदाद. जमीन अशी की दगड गोट्यांनी भरलेली. पाऊस वेळेवरी पडला तर पिवळी जवारी ,जवस असलं काहीतरी पदरी पडणार. म्हातारा बाप लोकांची जनावरं, गायी, म्हशी घेऊन रानात जाई. एका जनावरामागं रोज एक भाकर नि महिन्याला वीस रुपये मिळत. भाकर ताजी नाही तर शिळीच. पण काही का होईना दहा भाकरी नेमाने घरी येत. कधीमधी कालवण पण मिळे. तीन माणसांना लागणार तरी किती? त्यात एक पोरगी. तिने बेतानेच खायचे असते. दोनतीन भाकरी उरतच. त्या कडकडीत वाळवून, त्याचे तुकडे डब्यानी भरून ठेवायचे काम सुधीकडे असे, सकाळी थेंबभर तेलाची फोडणी करून त्यात बदाबदा पाणी ओतायचे. मिठाचा खडा टाकायचा. पाण्याला खळाखळा उकळी आली की त्यात वाळलेले तुकडे टाकायचे. एक वाफ आली की असा खमंग वास येई की तोंड पाण्याने भरून जाई. हे तुकडे म्हणजे रोजचा सकाळचा जन्मसावित्री नाश्ता. त्यात बदल नाहीच.

आपले आभाळ पेलताना/५९